पुणे : विधान परिषदेच्या माजी उपसभापती व शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनीतील 'सिल्व्हर रॉक्स' या बंगल्यात शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एका तरुणाने बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
घुसखोरी करणारा तरुण हा मूळचा नाशिकचा असून त्याचे नाव हिमांशू हिरे आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमागे केवळ चोरीचा हेतू होता की कोणता मोठा राजकीय किंवा वैयक्तिक कट रचला गेला होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
हिमांशूला नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्यात पकडण्यात आलं तेव्हा त्याच्याकडे हातोडा, पक्कड आणि दहा मिटर लांब दोरी आणि हॅण्ड ग्लोव्हज आढळून आले आहेत. गोऱ्हे यांचा पुण्यातील मॉडेल कॉलनीतील एका गल्लीच्या शेवटच्या टोकाला सिल्व्हर रॉक्स नावाचा बंगला आहे. २६ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजता हिमांशू हिरे त्यांच्या बंगल्यात शिरला आणि गूपचुप बंगल्याच्या गच्चीवर जाऊन लपला. त्यानंतर त्याने गच्चावरील पाण्याच्या टाकीचे कनेक्शन बंद केले.
नीलम गोऱ्हे त्यावेळी परगावी गेल्याने घरात फक्त त्यांचे सुरक्षारक्षक आणि पोलीस कर्मचारी होते. या सुरक्षारक्षकांनी आणि पोलिसांनी हिमांशूला पकडलं असता त्याच्याकडे या सगळ्या वस्तू आढळून आल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. दरम्यान, तरुणाने पोलिसांसमोर आपण विद्यार्थी असल्याचा दावा केला आहे.