पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल कोर्टानं यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या एका नेत्यानं केला आहे. विशाल अग्रवाल याचे आजोबा सुरेंद्रनाथ अग्रवाल यांचा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबध होता. त्यांनी मला मारण्यासाठी छोटा राजनला सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पुणे शहर सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण:
शिवसेना नेते अजय भोसलेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "२००९ साली मी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत होतो. त्यावेळी माझे रामकुमार अग्रवाल यांच्याशी मैत्रीचे संबंध होते. छोटा राजनचे माझ्या फोनवर फोन यायचे. या दोन भावांची (सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि रामकुमार अग्रवाल) मालमत्तेवरून भांडणं सुरु होती. हजार-बाराशे कोटी रुपयांचा व्यवहार होता. राम अग्रवाल सुरेंद्रकुमार अग्रवालला पैसे देत नव्हता. तेव्हा सुरेंद्रकुमारनं छोटा राजनला सांगितलं की, अजय भोसले हा माझ्या भावाचा खास मित्र आहे. तोच त्याला सपोर्ट करतो."
छोटा राजनला दिली होती सुपारी-
"त्यानंतर त्यानं (सुरेंद्रकुमार अग्रवाल) छोटा राजनला मला मारायची सुपारी दिली. निवडणूकीच्या प्रचार सांगता सभेत जर्मन बेकरीजवळ पहिल्यांदा माझ्यावर गोळीबार केला. पण गोळी लागली नाही. त्यानंतर आम्ही हल्लेखारांचा पाठलाग केला. तेव्हा त्यांनी वळून दुसरी गोळी मारली, ती माझ्या गाडीच्या काचेवर लागून मित्राच्या छातीत घुसली.", असं अजय भोसलेंनी सांगितलं.
आरोपींनी सर्व कबूल केलं, पण...
"बंड गार्डन पोलिसांकडे हा तपास आला. पोलिसांकडून विरोधी पक्षातील बापू पठारे यांना त्रास दिला जात होता, पण त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. हा प्रकार राजकीय हेतूनं झाला नव्हता. विरोधकांचा यात हात नव्हता. एक वर्षानंतर आरोपी पकडले गेले, तेव्हा आरोपींनी सर्व कबूल केलं. सुरेंद्रकुमारने छोटा राजनला सुपारी दिली होती आणि छोटा राजननं आम्हाला सांगितल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. छोटा राजनला पुढं अटक केल्यानंतर त्याच्या सर्व केसेस सीबीआयकडे सोपवण्यात आल्या. त्यात या केसचाही समावेश आहे. ही केस अजूनही सुरु आहे. सुरेंद्रकुमार यांना या प्रकरणात अटक व्हायला हवी होती, पण अजूनही झाली नाही," असं अजय भोसले म्हणाले.