पुणे : पुणेकरांचा मेट्रो प्रवास रविवारी (दि. २२) काही काळ विस्कळीत झाला. रामवाडी स्थानकात मेट्रो ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वनाज ते रामवाडी मार्गावरील सेवा सुमारे १० ते १५ मिनिटे प्रभावित झाली. यामुळे दोन्ही दिशांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली. रामवाडी स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली, तर तिकीटविक्रीही तात्पुरती थांबवण्यात आली होती. दरम्यान, तांत्रिक बिघाड झालेली ट्रेन डेपोत पाठवून पर्यायी ट्रेन सेवेत दाखल करण्यात आली. त्यानंतर मेट्रो सेवा पूर्ववत झाली.
रामवाडी स्थानकात मेट्रो ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रामवाडी मेट्रो स्थानकात एका ट्रेनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वनाज-रामवाडी मार्गावरील मेट्रोची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या मार्गावर दोन्ही दिशांनी धावणाऱ्या गाड्यांना विलंब झाला. सुरुवातीला दुरुस्तीसाठी ३० ते ४५ मिनिटे लागू शकतात, अशी माहिती समोर आली होती. मात्र, मेट्रोच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १० ते १५ मिनिटांत सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
प्रवाशांची गर्दी, तिकीट सुविधाही काही काळ बंद
मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली. गाड्या वेळेवर न मिळाल्याने प्रवाशांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली. त्यातच तिकीट काढण्याची सुविधाही तात्पुरती बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. या काळात स्थानकावर प्रवासी प्रतीक्षा करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पर्यायी मेट्रो ट्रेन तैनात करून सेवा पूर्ववत
बिघाड झालेली मेट्रो ट्रेन तपासणीसाठी डेपोमध्ये पाठवण्यात आली. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार ठेवलेली पर्यायी ट्रेन तातडीने सेवेत दाखल केली. त्यामुळे मेट्रोची वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात आली.
तांत्रिक बिघाडाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट
मेट्रो ट्रेनमध्ये नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यात येणार असून, त्याचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. सध्या वनाज-रामवाडी मार्गावरील मेट्रो सेवा सुरळीत असून, नियोजित वेळापत्रकानुसार गाड्या धावत असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.