Pune : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शरद पवार यांची चौकशीची मागणी 
महाराष्ट्र

Pune : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शरद पवार यांची चौकशीची मागणी

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून पार्थ पवार यांच्यासह अजित पवारांनाही लक्ष्य केले जात आहे. मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांची पाठराखण केल्याने पक्षात संभ्रम निर्माण झाला होता. आता अखेर शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडली असून थेट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे.

Swapnil S

अकोला : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते शरद पवार यांनी शनिवारी प्रथमच भाष्य केले. पुण्यातील जमीन व्यवहाराचे प्रकरण गंभीर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एखादी गोष्ट गंभीर असल्याचे मुख्यमंत्री सांगत असतील तर त्याबाबत चौकशी करून वास्तव चित्र त्यांनी समाजासमोर ठेवले पाहिजे. त्यामुळे ते काम त्यांनी करावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे शरद पवार यांनी येथे एका

पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अडचणीत आले आहेत. काँग्रेसमधील विविध नेत्यांकडून या प्रकरणावरून पार्थ पवार यांच्यासह अजित पवारांनाही लक्ष्य केले जात आहे. मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांची पाठराखण केल्याने पक्षात संभ्रम निर्माण झाला होता. आता अखेर शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडली असून थेट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे.

कुटुंब, राजकारण वेगळे

दरम्यान, कुटुंबातील एका सदस्यावर जमीन गैरव्यवहाराचे आरोप झाल्याबद्दल पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, प्रशासन, राजकारण, कुटुंब आणि कुटुंबप्रमुख या गोष्टींमध्ये फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून म्हणाल तर आम्ही एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवल्या आहेत. माझा एक नातू हा अजित पवारांविरोधात उभा होता. अजित पवारांची पत्नी माझ्या मुलीविरोधात निवडणुकीत उभी होती, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार म्हणाले की, कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पार्थ पवार पुणे जमीन व्यवहार प्रकरणात चौकशी करून वास्तव समाजासमोर ठेवले पाहिजे. सुप्रिया सुळे यांनी घेतलेली भूमिका हे त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते, असे पवार यांनी म्हटले आहे.

फडणवीस उत्तर देतील

कंपनीत एक टक्के भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो, पण ९९ टक्के शेअर असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा नाही, असे का, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर, त्याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतील, असे शरद पवार म्हणाले. दुसरीकडे, कर्जमाफीबद्दल घोषणा प्रत्यक्ष कृती नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटने मतदान घेतल्यास शंका राहणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याबाबत महाविकास आघाडीने एकत्र बसून निर्णय घ्यावा, असे शरद पवार यांनी सांगितले.

१ ते १९ डिसेंबर या संसदेचे कालावधीत हिवाळी अधिवेशन

मुंबईत ९० हजार भटके कुत्रे, निवारा केंद्रे केवळ ८; BMC ची माहिती

जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश

'इंडिया' आघाडीला ६५ व्होल्टचा झटका बसणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला

वडेट्टीवारांना कोणीतरी चुकीची माहिती दिली; मंत्री प्रताप सरनाईक यांचा खुलासा!