पुणे : पुणे शहरात व्यावसायिक आणि उद्योजकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या कुख्यात बिश्नोई गँगच्या मोठ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण कारवाईची सविस्तर माहिती दिली.
ताब्यात घेण्यात आलेल्या चार आरोपींपैकी दोघांना पंजाबमधील भटिंडा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. हे आरोपी मूळचे सिरसा (हरयाणा) आणि हनुमानगड (राजस्थान) येथील रहिवासी असून ते कामानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात राहत होते. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि गोळीबार (फायरिंग) करणाऱ्या दोन व्यक्तींची ओळख पटवण्यात आली असून त्यापैकी एका आरोपीला पुणे पोलिसांनी तीन दिवसांपूर्वीच अटक केली आहे. तसेच या गुन्हेगारांना पुण्यात स्थानिक पातळीवर मदत करणाऱ्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेने आतापर्यंत आरोपींकडून ३ अग्निशस्त्रे (फायर आर्म्स) जप्त केली आहेत. या धडक कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
१५ दिवसांत ५,००० किलोमीटरचा प्रवास आणि आंतरराज्य मोहीम
हा गुन्हा उघडकीला आणण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अत्यंत क्लिष्ट आणि धाडसी आंतरराज्य मोहीम राबवली. पुण्यापासून सुरू झालेली ही तपास मोहीम नाशिक, सूरत, अजमेर, गुजरात, राजस्थान, हरयाणा आणि पंजाब अशा अनेक ठिकाणी पोहोचली. १५ दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी विविध राज्यांत ५,००० किमीपेक्षा जास्त प्रवास केला.
पाच पथकांची अहोरात्र मेहनत
या यशस्वी कारवाईसाठी गुन्हे शाखेची एकूण ५ पथके अहोरात्र काम करत होती. या पथकांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांना ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करणार
हे आरोपी कोणाच्या सांगण्यावरून खंडणीसाठी फोन करत होते की त्यांनी स्वतःच्या पातळीवर हा कट रचला होता, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत. शहरातील कोणत्याही व्यावसायिकाला किंवा नागरिकाला दमबाजी करणे सहन केली जाणार नाही; आम्ही हे रॅकेट मुळासकट उद्ध्वस्त करू, असा कडक इशारा अमितेश कुमार यांनी दिला आहे.