महाराष्ट्र

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ॲक्शन मोडवर; गजा मारणे, बाबा बोडकेसह जवळपास ३०० गुंडाची काढली ओळख परेड

Rakesh Mali

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दिवसाढवळ्या खून, बलात्कारसारख्या घटना घडत असल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. पुण्यातील नागरिक वाढत्या गुन्हेगारीमुळे भयभीत झाले आहेत. कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर तर गुन्हेगारांना रान मोकळे झाल्याची परिस्थिती आहे. अशात पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी पुणे शहरातील जवळपास २०० ते ३०० गुंडांना पोलीस मुख्यालयात बोलवत त्यांची ओळख परेड काढली.

गजा मारणे, बाबा बोडकेसारख्या कुख्यात गुंडांचा समावेश-

अमितेश कुमार यांनी काढलेल्या या परेडमध्ये काही सराईत गुंड, अट्टल गुन्हेगार, भुरटे चोर होते. तसेच, काही गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार आणि तडीपार अशा जवळपास २०० ते ३०० गुंडांचा यात समावेश होता. यात कुख्यात गुंड गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ हे देखील होते. या सर्वांचे नाव, गाव विचारण्यात आले. तसेच, ते सध्या कुठे वास्तव्यास आहेत, काय करतात याचीही माहितीही घेण्यात आली. याचबरोबर या गुन्हेगारांना कोणतेही गुन्हेगारी कृत्य केले तर याद राखा, अशी तंबीही आयुक्तांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परेडवेळी पोलीस मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

आयुक्तांकडून परेड सुरु असताना प्रत्येक गुंडाची देहबोली पाहण्यासारखी होती. कुणाची दाढी वाढलेली होती. कुणाचे केस विसकटलेले, टक्कल पडलेले. काही वयस्कर तर काही वयात आलेले, अशा सर्व प्रकारचे गुन्हेगार होते. यावेळी कुणाच्या नजरेत जरब होती. तर, एकजण मिशिला पीळ देत होता. पोलीस आयुक्तांनी बोलावल्यानंतर मात्र सर्वच गुंड खालीमान घालून उभे असल्याचे पाहायला मिळाले.

नागपूर शहराच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यात यशस्वी-

अमितेश कुमार हे नागपूरचे आयुक्त होते. त्यावेळी ते नागपूर शहराच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यात यशस्वी झाले होते. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात सर्व टोळ्यांना समोरासमोर आणून अशा प्रकारे तंबी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता तरी पुण्यातील गुन्हेगारी कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस