पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला अखेर पोलिसांनी बेड्या घातल्या. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून मध्यरात्रीनंतर साधारण १.३० च्या सुमारास पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. गावकऱ्यांनीही पोलिसांना मोठे सहकार्य केले.
बलात्काराची ही घटना उघडकीस आल्यापासून पोलिस आरोपीचा कसून शोध घेत होते. ड्रोन आणि श्वानपथकाचीही मदत घेतली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे गुन्हा केल्यानंतर आरोपीने थेट त्याचे गाव शिरूर गाठले होते. घरामध्ये ५ तास थांबल्यानंतर तो त्या ठिकाणावरून फरार झाला आणि एका उसाच्या शेतात लपल्याची माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर रात्री १२ च्या सुमारास एका नातेवाईकाच्या घरात आरोपी दत्तात्रय गाडे हा पाणी पिऊन गेल्याची माहिती नंतर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.
साताऱ्याची बस तिकडे लागलीये
मंगळवारी पहाटे फलटणला जाण्यासाठी तरुणी स्वारगेट बसस्थानकात आली होती. त्यावेळी साताऱ्याला जाणारी बस दुसरीकडे लागली असल्याचे सांगून आरोपी तरुणीला दुसऱ्या बसमध्ये घेऊन गेला आणि अत्याचार केला.
आरोपीवर यापूर्वी शिक्रापूर याठिकाणी २ गुन्हे तर शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात असे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. झटपट पैसे कमावण्याच्या नादात आरोपीने चोरी आणि लुटमारीसारखे प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला राजकारणाचीही आवड होती. तसेच अनेक राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याने गावात निवडणूकही लढवली होती, मात्र त्यात त्याचा पराभव झाला होता.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठविले आहे. पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील तपास अहवाल, फिर्यादीची प्रत तीन दिवसांत राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
‘ती’ शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारामुळे अवघ्या राज्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी ठाकरे गटाने बसस्थानकातील सुरक्षारक्षकांची केबिन फोडल्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून घटना घडलेली शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली आहे. दरम्यान, पोलिसांना सदर बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याचा बूट आढळला आहे.
सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे - प्रताप सरनाईक
या घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले असून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट बसस्थानकांतील सुरक्षारक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले की, “१४ हजार ३०० बसेस, ४५० इलेक्ट्रिक बसेस आणि ३५० भाडेतत्त्वावरील बसेसवर जीपीएस यंत्रणा लावणार आहोत. बस डेपोमध्ये बसेस बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. त्याचा फायदा समाजकंटक घेत असतात. या गाड्यांना १५ एप्रिलपर्यंत भंगारात काढणार आहोत. या राज्यातील महिलांना सुरक्षा देण्याबाबत तसेच अशाप्रकारच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना आखता येतील का, याबाबत चर्चा करण्यात आली.” सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देशही दिले.
तरुणीने आरोपीला विरोध केला नाही - योगेश कदम
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी सकाळी स्वारगेट बसस्थानकाला भेट देत आढावा घेतला. बलात्काराचे हे प्रकरण फोर्सफुली घडले नाही. स्वारगेट एसटी स्टँडवर जी घटना घडली, त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुली कृती झाली नाही. ही घटना घडली तेव्हा शिवशाही बसच्या आजुबाजूला १० ते १५ जण होते. पण तरुणीने विरोध न केल्याने कुणालाही शंका आली नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला. आता आरोपी ताब्यात आल्यावर आणखी गोष्टी स्पष्ट होतील, असे गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले.
मंत्र्यांनी वक्तव्य करताना थोडी लाज बाळगावी - वडेट्टीवार
पुणे-स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचे नाते काय? आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच महायुतीतील मंत्र्याकडून आरोप का? स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजून आरोपी पकडला नाही, तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आरोपीला क्लीनचिट देत आहेत? स्वारगेटमध्ये बलात्कार झाला आणि या मंत्र्यांच्या मते त्या मुलीने विरोध केला नाही, म्हणजे या गुन्ह्याची जबाबदारी त्या पीडित मुलीवर ढकलत आहे. विधान करताना मंत्र्यांनी थोडी लाज, शरम बाळगली पाहिजे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर केली.