पुणे : स्वारगेट बसस्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग गेला आहे. गुन्हे शाखेला तातडीने तपास ताब्यात घेण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
स्वारगेट बसस्थानकावर एका शिवशाही बसमध्ये नराधम आरोपी दत्ता गाडे याने २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या घटनेला जवळपास आठवडा होत आला. घटनेनंतर ७५ तासांत आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी आरोपीच्या गावकऱ्यांच्या मदतीने मुसक्या आवळल्या. या प्रकरणी दररोज नववने खुलासे होत आहेत. अशातच आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
आरोपी दत्तात्रय गाडे हा गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी दत्ता गाडेवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल आहेत. तर शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या प्रकरणात आरोपीकडून आणि त्याच्या कुटुंबीयांकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे दिला आहे.