Pune : विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; पुण्यात नीट-यूजी परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी निषेध मोर्चा  
महाराष्ट्र

Pune : विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; पुण्यात नीट-यूजी परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी निषेध मोर्चा

पुण्यात शुक्रवारी नीट-यूजी परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराचा जाब विचारण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून मोठा एल्गार पुकारला.

Swapnil S

पुणे : पुण्यात शुक्रवारी नीट-यूजी परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराचा जाब विचारण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून मोठा एल्गार पुकारला. 'कॉकरोच जनता पार्टी' च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी करत संपूर्ण शहर दणाणून सोडले. पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा आणि लाल महाल परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. मुसळधार पावसाची तमा न बाळगता हजारो तरुण आणि पालक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत असताना पुण्यातील विद्यार्थ्यांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ही भव्य रॅली काढली होती. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हातात भारताचा तिरंगा घेतला होता, तर राजकीय पक्षांचे झेंडे किंवा चिन्हे वापरण्याला आयोजकांनी स्पष्ट मनाई केली होती.

‘अभ्यास आम्ही करायचा, पेपर तुम्ही फोडायचा?’

आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी अत्यंत कल्पक आणि उपरोधिक फलक (पोस्टर) हाती घेतले होते. 'जेन झी' पिढीच्या या तरुणांनी सोशल मीडियावरील प्रसिद्ध मीम्स, चित्रपटांमधील संवाद आणि इंटरनेट ट्रेंड्सचा वापर करून सरकारवर बोचरी टीका केली. ‘पेपर लीक झाला, आमचे भविष्य नका लीक करू’, ‘अभ्यास आम्ही करायचा, पेपर तुम्ही फोडायचा?’ आणि ‘शिक्षण मंत्री जबाबदारी कधी घेणार?’ अशा आशयाचे फलक पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होते.

...तर आंदोलन अधिक तीव्र करणार

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. यावेळी केवळ धर्मेंद्र प्रधानच नव्हे, तर दिल्लीतील मारहाणीला जबाबदार धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत नीट पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी होत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

पोलिसांचा कडोकोट बंदोबस्त

पुण्यातील शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय या ७ ते ८ किलोमीटरच्या मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुमारे १००० ते १५०० पोलिसांचा फौजफाटा, डीसीपी दर्जाचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक या मोर्चावर सीसीटीव्ही आणि इंटेलिजन्स व्हॅनच्या माध्यमातून लक्ष ठेवून होते. वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांनी आधीच काही मार्गांवर बदल केले होते. मोर्चामध्ये काही स्थानिक राजकीय नेत्यांनीही आपला सहभाग नोंदवला; मात्र, विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून ठराविक अंतर राखल्याचे दिसून आले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

MBBS पदवीधरांसाठी १ वर्षाचा सेवा बाँड रद्द; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

Mumbai : दोन विशेष जलदगती न्यायालये स्थापन; उच्च न्यायालयाकडून अंमलबजावणी, परीक्षेतील गैरप्रकार रोखणार

Mumbai : कंत्राटदाराचा परवाना स्थगित; महापालिकेकडून कठोर कारवाई

Mumbai : एफडीएने ५ बेकऱ्यांचे परवाने केले रद्द; चार बेकऱ्या बंद

Mumbai : घाटकोपरला उन्नत डेक प्रवाशांच्या सेवेत; गर्दीचे विभाजन होण्यास मिळणार मदत