पुणे : गणेशोत्सव आणि सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे तसेच कर्णकर्कश लाऊडस्पीकरच्या वापराला विरोध करत ध्वनीप्रदूषणाविरोधात सातत्याने भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना गुरुवारी (दि. ३) पुण्यात मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, बापट यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील टिळक रोडवरील कशाळे चौकात बापट यांच्यावर हल्ला करण्यात आला. एका गणेश मंडळाशी संबंधित काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे. या घटनेवेळी सुमारे चार जण उपस्थित असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
वृत्तवाहिनीशी बोलत असताना मारहाण
बापट पुण्यात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना काही तरुण तिथे आले. त्यांनी बापट यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्यावर मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.
'माझ्या भूमिकेमुळे नाराजी असावी'
या घटनेबाबत बोलताना बापट यांनी सांगितलं की, ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना काही जणांनी तिथे येऊन त्यांना बोलण्यापासून रोखलं. डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आपण मांडलेल्या भूमिकेमुळे संबंधित व्यक्ती नाराज असाव्यात. आपण त्या वेळी निशस्त्र असल्याचा फायदा घेत आधी बोलण्यापासून रोखण्यात आलं आणि नंतर मारहाण करण्यात आली, असंही बापट यांनी म्हटलं. हल्लेखोरांना सवंग प्रसिद्धी मिळवायची होती, त्यामुळे हा प्रकार करण्यात आला असावा, असेही ते म्हणाले.
कोण आहेत विद्यानंद बापट?
विद्यानंद बापट हे ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. पुणे महानगरपालिकेत गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत त्यांनी डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांच्या वापराला विरोध केला होता. त्यानंतर ते चर्चेत आले होते.
डीजेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
गणेशोत्सवाच्या काळात डीजेचा आवाज आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा दरवर्षी चर्चेत येतो. त्यातच बापट यांच्यावर झालेल्या कथित मारहाणीमुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, बापट यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, घटनेचा तपास सुरू आहे. मारहाणीमागचं नेमकं कारण आणि संबंधितांची भूमिका पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.