पुणे : पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या डीजे आणि लाऊडस्पीकर यांच्या अमर्याद वापराबाबत सातत्याने कायदेशीर आणि सामाजिक आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी सकाळी टिळक रोड परिसरात एका तरुणाने थेट प्रक्षेपण सुरू असतानाच हल्ला केला. बापट हे माध्यमांशी संवाद साधत असताना हा प्रकार घडला. या घटनेनंतर पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे हलवून आरोपी संतोष चव्हाण याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सार्वजनिक उत्सवांमध्ये आवाजाची मर्यादा पाळली जावी आणि डीजे-लाऊडस्पीकरच्या वापरावर q संमिश्र पानावरपुणे : पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या डीजे आणि लाऊडस्पीकर यांच्या अमर्याद वापराबाबत सातत्याने कायदेशीर आणि सामाजिक आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी सकाळी टिळक रोड परिसरात एका तरुणाने थेट प्रक्षेपण सुरू असतानाच हल्ला केला. बापट हे माध्यमांशी संवाद साधत असताना हा प्रकार घडला. या घटनेनंतर पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे हलवून आरोपी संतोष चव्हाण याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सार्वजनिक उत्सवांमध्ये आवाजाची मर्यादा पाळली जावी आणि डीजे-लाऊडस्पीकरच्या वापरावर नियंत्रण असावे, अशी ठाम भूमिका विद्यानंद बापट मांडत आहेत. याच मुद्द्यावर गुरुवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत असताना, संतोष चव्हाण नावाचा तरुण तिथे आला. त्याने तुला यावर आक्षेप घ्यायला कोणी सांगितले? असा वाद घालत थेट बापट यांच्याशी हुज्जत सुरू केली. त्यानंतर ‘मला याला आणखी दोन मारू द्या,’ असे कॅमेऱ्यासमोरच ओरडत त्याने थेट बापट यांच्या कानशिलात लगावली आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे थेट प्रक्षेपणात मोठा गोंधळ उडाला.
आरोपीचा पोलिसांसमोरच उद्दामपणा!
पोलीस कोठडीत असतानाही आरोपी संतोष चव्हाण याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा कोणताही भाव नव्हता. माध्यमांशी बोलताना तो अत्यंत उद्धटपणे म्हणाला, ‘तो (बापट) सातत्याने टीका करतो, त्याला आणखी मारायला पाहिजे. पुणे शहरातील गणेशोत्सवाबाबत जो कोणी बोलेल, त्याच्या अशाच कानाखाली मारणार’, असा त्याचा उद्दामपणा समोर आला आहे.
आर्थिक गणिताचा मांडला युक्तिवाद...
हल्ल्याच्या घटनेनंतर संतोष चव्हाणचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने थेट विद्यानंद बापट यांचे नाव घेऊन गणेशोत्सवाच्या अर्थकारणावर भाष्य केले होते. त्याने म्हटलेय की, आवाजाची मर्यादा पाळल्यास साऊंड सिस्टीमचा त्रास होणार नाही.
पुण्यात सुमारे ३,८०० ते ४,००० छोटे-मोठे आणि १४०० नोंदणीकृत गणेश मंडळे आहेत. जर तुम्ही ७०० मंडळांचे साऊंड बंद करायला सांगत असाल, तर तुम्ही ८ हजार घरांमधील ‘चूल’ बंद करायला सांगत आहात.त्याने पुढे युक्तिवाद केला होता की, गणेशोत्सवामुळे लाईट, जनरेटर, ट्रॅक्टर-ट्रॉली, हमाल, ऑपरेटर आणि सजावट करणाऱ्या हजारो स्थानिक कुटुंबांचे पोट चालते.
पुण्यात या १२ दिवसांच्या काळात मंडळांचा खर्च १०० कोटींपेक्षा जास्त असतो, तर घरगुती गणेशोत्सव मिळून हा आर्थिक उलाढालीचा आकडा हजार कोटींच्या घरात जातो.उत्सव आला की काही पर्यावरणवादी जागे होतात आणि ज्ञान देऊ लागतात, असा थेट आरोप त्याने केला होता. तसेच, निवडणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांचा प्रचारासाठी वापर करणारे १ खासदार, ८ आमदार आणि १६५ नगरसेवक उत्सवाच्या काळात मंडळांच्या बाजूने ठामपणे उभे राहत नाहीत, अशी खंतही त्याने या व्हिडिओत व्यक्त केली होती.
प्रसिद्धीसाठी वेड्या माणसाचा प्रयत्न : विद्यानंद बापट
या निंदनीय हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना विद्यानंद बापट यांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, केवळ सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका वेड्या माणसाने माझ्यावर हात उचलला. त्याला केवळ प्रसिद्धीच्या झोतात यायचे होते.
मुख्यमंत्र्यांकडून निषेध
या हिंसक घटनेचे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आरोपीला गावगुंड असे संबोधले आहे. रोहित पवार म्हणाले की, बापट यांच्या भूमिकेला वैचारिक पद्धतीने विरोध करण्याऐवजी थेट हल्ला करणे हे एका पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. महाराष्ट्रात अशी गुंडगिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. पोलीस प्रशासनाने या हल्लेखोरांवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि विद्यानंद बापट यांना तातडीने सुरक्षा पुरवावी.
हल्लेखोर माजी मंडळ अध्यक्ष
पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी संतोष चव्हाण हा पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी आहे. तो स्थानिक बांधकाम व्यावसायिकाकडे काम करतो. विशेष म्हणजे, तो राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. बापट यांनी घेतलेल्या ‘डीजे’विरोधी भूमिकेवर प्रचंड चिडून जाऊन त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
सर्व थरांतून निषेध
बापट यांच्यावरील हल्ल्याचा सर्व थरातून निषेध होत आहे. आरोग्य सेना व अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेने बापट यांना ठाम पाठिंबा व्यक्त केला असून मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी तातडीने अटक करावी, अशी मागणी केली आहे. संविधानाने दिलेला अभिव्यक्तीचा आणि विरोधाचा अधिकार अबाधित राहायला हवा, असे मतही त्यांनी नोंदवले आहे.