Raigad : भरत गोगावले, गिरीश महाजन झाले पालकमंत्री 
महाराष्ट्र

पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला! भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री; गिरीश महाजनांकडे नाशिकची धुरा

तब्बल १९ महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर रायगड जिल्हा पालकमंत्रीपदाची माळ रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या गळ्यात पडली आहे, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी अपेक्षेप्रमाणे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली आहे.

Swapnil S

मुंबई : तब्बल १९ महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर रायगड जिल्हा पालकमंत्रीपदाची माळ रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या गळ्यात पडली आहे, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी अपेक्षेप्रमाणे  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली आहे.  सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी नाशिक आणि रायगड जिल्हा पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये पालकमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार  राष्ट्रवादी अजित पवार गटाला रायगड  तर भाजपला   नाशिकचे पालकमंत्रिपद मिळाले  होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाने रायगड पालकमंत्रिपदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्यानंतर  अजित पवार गटाने नाशिक पालकमंत्रिपदावर दावा केला. त्यामुळे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री  नेमणुकीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली होती.  

जानेवारी २०२५ पासूनच्या  स्थगितीवर आज  निर्णय झाला. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने  रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या बदल्यात रायगड जिल्हा पालकमंत्रिपदावरील दावा सोडला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे निवडून आल्यानंतर शिंदे गटाला रायगड पालकमंत्रिपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार  रायगड पालकमंत्रिपदावर गोगावले यांची वर्णी लागली आहे. या नियुक्तीने गोगावले यांचे रायगड  पालकमंत्रिपदाचे स्वप्न साकार झाले आहे.

राष्ट्रवादीचा दावा अमान्य; नाशिक भाजपकडेच

महायुतीत नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वाधिक म्हणजे १५ पैकी सात आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे नाशिक पालकमंत्रीपदावर अजित पवार गटाचा दावा होता. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने नाशिकचे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवले आहे.  

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

टाटा सन्सची AGM आज होणार नाही! वार्षिक सर्वसाधारण सभा तहकूब होण्याची शक्यता

FDA ला न्यायालयाचा दणका; पुण्याच्या मिठाईच्या दुकानाचा परवाना पूर्ववत, ५ लाख रुपयांची भरपाई देण्याचेही निर्देश

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

राज्यातील शैक्षणिक संस्थांची चौकशी करा! SIT ला उच्च न्यायालयाचे निर्देश; राजकीय संबंध असलेल्या संस्थेची चौकशीतून सुटका नको

मी महाराष्ट्रातच! मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुनरुच्चार; दिल्लीत मोदींची भेट, विकास प्रकल्पांबाबत चर्चा