मुंबई : रायगड व नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा आज-उद्या सुटेल, असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावर दावा केला असून मंत्री भरत गोगावले पालकमंत्री न झाल्यास उठाव करण्याचा इशारा शिंदेंच्या शिवसेनेचे रायगडचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ जाहीर करण्यात आले. नंतर पालकमंत्रीही जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रिपदी नेमण्यात आले होते. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेच्या जोरदार विरोधामुळे त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले. आदिती तटकरे यांनाच पुन्हा पालकमंत्री करावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोर लावला जात आहे, तर रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांनाच पालकमंत्रिपद मिळावे यासाठी शिंदे सेना आग्रही आहे.
भरत गोगावले पालकमंत्री होणार, असा रेटा शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी लावला आहे, तर आदिती तटकरे पालकमंत्री व्हाव्यात यासाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अधिकच चिघळणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यात तिढा सुटणार?
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी ते रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर मुंबईत त्यांचे कार्यक्रम आहेत. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला जाणार आहेत. त्यामुळे अमित शहा यांच्या या दौऱ्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद देखील सुटण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा आहे.