Raigad : काशिद समुद्रात एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन नौका जप्त; मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई 
महाराष्ट्र

Raigad : काशिद समुद्रात एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन नौका जप्त; मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई

रायगड जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई केली आहे. काशिद समुद्रकिनाऱ्यासमोरील जलक्षेत्रात एलईडी दिव्यांच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या दोन नौका विभागाच्या गस्ती पथकाने जप्त केल्या.

Swapnil S

उरण : रायगड जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई केली आहे. काशिद समुद्रकिनाऱ्यासमोरील जलक्षेत्रात एलईडी दिव्यांच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या दोन नौका विभागाच्या गस्ती पथकाने जप्त केल्या. ९ आणि १२ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात एलईडी दिवे आणि जनरेटर हस्तगत करण्यात आले आहेत.

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन प्रखर एलईडी दिव्यांच्या साहाय्याने अवैध मासेमारी सुरू असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाला मिळाली होती. त्यानुसार गस्ती पथकाने समुद्रात सापळा रचून ही कारवाई केली. यामध्ये दिघी येथील नामदेव महादेव कावळे यांच्या मालकीची 'साईरत्न' (नोंदणी क्रमांक IND-MH-३-MM-४४५७) ही नौका, तसेच अलिबाग कोळीवाडा येथील हितेंद्र नरेश डबरी यांच्या मालकीची विनानोंदणीकृत नौका ताब्यात घेण्यात आली. 'साईरत्न' नौकेतून आठ एलईडी फोकस, तीन पाण्याखालील दिवे आणि एक जनरेटर जप्त करण्यात आला. तर विनानोंदणीकृत नौकेतून १७ एलईडी फोकस, दोन पाण्याखालील दिवे, तीन सायन लाइट आणि एक जनरेटर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

मत्स्यव्यवसाय आयुक्त, अतिरिक्त आयुक्त (योजना), सहआयुक्त आणि रायगड-अलिबागचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड-जंजिरा येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी स्वप्निल अ. दाभणे यांनी ही कारवाई केली. जप्त केलेले साहित्य अलिबाग येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयात जमा करण्यात आले असून, दोन्ही नौका रेवदंडा येथील जेट्टीवर ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित नौकामालकांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मदर डेअरी, अमूलपाठोपाठ आता गोकुळचे दूधही महागणार? दरवाढीच्या हालचाली सुरू

विलीनीकरणाची माझ्यासमोरच चर्चा; राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

राईडपूर्वीच 'टिप' मागणे OLA ला पडले महागात

मोदी माझा फोन टॅप करतात...; राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप

नियोजित आंदोलनापूर्वी वांगचुक यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; घराबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त