रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा 
महाराष्ट्र

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Dahi Handi 2026 : हिंदूंच्या सर्वच सणांमधील एक महत्त्वाचा सण म्हणजे दहीहंडी. दहीहंडीच्या दिवशी विविध गोविंदा पथकांद्वारे उंच-उंच मानवी मनोरे रचून हंडी फोडतानाची दृश्य आपणाला काही नवीन नाहीत.

प्रतिनिधी

धनंजय कवठेकर/रायगड

हिंदूंच्या सर्वच सणांमधील एक महत्त्वाचा सण म्हणजे दहीहंडी. दहीहंडीच्या दिवशी विविध गोविंदा पथकांद्वारे उंच-उंच मानवी मनोरे रचून हंडी फोडतानाची दृश्य आपणाला काही नवीन नाहीत. मात्र, याला अपवाद अशी एक दहीहंडी अलिबाग तालुक्यातील कुर्डस या गावी आताही भरवली जाते. या गावात मागील काही वर्षांपासून विहिरीच्या मध्यभागी वरील बाजूस दहीहंडी बांधण्याची अनोखी परंपरा आजदेखील जपली जात आहे.

कुर्डस गावातील देऊळ आळी येथील पिंगळे, पाटील, शेरमकर, थळे आणि केणी परिवारातील धाडसी शेतकरी तरुणांनी १९९१ साली एकत्र येत वेगळे काही तरी करण्याच्या विचारातून या विहिरीवरील दहीहंडीची संकल्पना उदयाला आली.

...तर ती दहीहंडी फुटली

पहिली काही वर्षे या देऊळ आळीतील विहिरीवर तसेच बाजूला असलेल्या सीताफळाच्या झाडाचा आधार घेत दहीहंडी फोडण्याचे प्रयत्न झाले. पण आता ही दहीहंडी विहिरीच्या मध्यभागी लावली जाते. ही दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके विहिरीच्या काठावर उभे राहून उंच उडी मारून दहीहंडीला स्पर्श करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. जर दहीहंडीला गोविंदाच्या हाताचा स्पर्श झाला तर ती दहीहंडी फुटली असे समजून नंतर ती दहीहंडी खाली उतरवून त्या विहिरीत ती फोडली जाते. दहीहंडीला स्पर्श झाला की संपूर्ण गोविंदा पथक त्या विहिरीमध्ये उड्या मारून आनंद व्यक्त करतात. दहीहंडीचे आयोजन देऊळ आळी गोविंदा पथकामार्फत केले जाते. पराग पिंगळे, सचिन पिंगळे, गुरुनाथ शेरमकर, सुशीलकुमार पिंगळे, गणेश केणी आणि पिंगळे परिवार याचे कार्यवाहक म्हणून काम पाहतात.

सांभाळण्यासाठी कठड्यावर गोविंदा बसतात

विहिरीवरील दहीहंडीचे विशेष म्हणजे जमिनीवरील मनोरे सर्वच ठिकाणी होतात. पण इकडे गावातील मोठ्या विहिरीवर आजूबाजूच्या गावातील गोविंदा हंडी फोडण्यासाठी येतात. विहिरीवर गोल कठड्यावर बसून काही जण गोविंदाला हाताच्या पंजात उचलून हंडीच्या दिशेने उडवतात. गोविंदांनी उंच उडून दहीहंडीला हात लावून विहिरीत मध्यभागी पाण्यात पडायचे जरा अंदाज चुकला तर गोविंदा विहिरीच्या कठड्यावर पडू शकतो. म्हणूनच विहिरीच्या कठड्यावर इतर गोविंदा बसलेला असतात. हे करत असताना कोणतीही दुखापत अथवा इजा गोविदा पथकातील कोणालाच होत नाही अथवा आजपर्यंत झालेली नाही, हे या विहिरीतील दहीहंडीचे वैशिष्ट्य आहे. ही दहीहंडी पाहण्यासाठी रायगडसह मुंबई, ठाणे तसेच मोठ्या शहरातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू

Mumbai : मिथेनचा 'निरी'कडून अभ्यास; कांजूर डम्पिंगवरील हवेच्या गुणवत्तेवर नजर, दुर्गंधी, प्रदूषण, आगीच्या हॉटस्पॉटचा शोध घेणार