ओमकार नागावकर/रेवदंडा
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांना गणेश विसर्जनासाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ येणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
रेवदंडा, चौल व परिसरातील हजारो भाविक परंपरेने रेवदंडा समुद्रकिनारी श्री गणेशाचे विसर्जन करतात. सुरक्षित आणि प्रशस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समुद्रकिनाऱ्याची आजची अवस्था मात्र अत्यंत चिंताजनक बनली आहे. कंपनीच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात साचलेल्या चिखलामुळे समुद्रापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असून विसर्जनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर यंदाही प्रशासन शेवटच्या क्षणापर्यंत हातावर हात ठेवून बसणार का, असा संतप्त प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत.
भाविकांची सुरक्षा वाऱ्यावर
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि भावनेचा उत्सव आहे. अशा वेळी श्रद्धेपेक्षा चिखलाशी झुंज द्यावी लागणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यापेक्षा दुर्घटना होऊच नये, यासाठी आज निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे आहे. रेवदंडा ग्रामपंचायत, संबंधित प्रशासन आणि जबाबदार यंत्रणांनी या प्रश्नाकडे तक्रार म्हणून न पाहता भाविकांची सुरक्षितता व सार्वजनिक हिताचा विषय म्हणून गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. यंदा तरी चिखलमुक्त, सुरक्षित व प्रकाशयुक्त विसर्जन व्यवस्था होणार की, हालअपेष्टा सहन कराव्या लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जीवघेणी परिस्थिती
गणेशमूर्ती खांद्यावर घेऊन समुद्रात उतरावे लागणारे भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. चिखलात पाय रुतणे, तोल जाणे, मूर्ती पडण्याचा धोका किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रद्धेच्या उत्सवात अशी जीवघेणी परिस्थिती निर्माण होणे ही प्रशासनासाठी गंभीर बाब मानली जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षीही हाच प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने चिखल हटवण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो केवळ तात्पुरता ठरला. यंदाही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
गणेश आगमनापूर्वी समुद्रकिनाऱ्यावरील संपूर्ण चिखल तातडीने हटवण्यात यावा.
विसर्जनासाठी सुरक्षित, सपाट व चालण्यायोग्य मार्ग तयार करण्यात यावा.
रात्रीच्या विसर्जनासाठी समुद्रकिनाऱ्यावर उच्च क्षमतेचे एलईडी फ्लडलाइट्स बसवण्यात यावेत, जेणेकरून समुद्रात उतरणाऱ्या भाविकांना स्पष्ट दिसेल आणि अपघात टळतील.
लाइफगार्ड, बचाव पथक, बॅरिकेड्स, दोरखंड व प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात यावी.
चिखल हटवणे शक्य नसल्यास तातडीने कृत्रिम विसर्जन तलाव उभारून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
संबंधित कंपनीच्या कामांमुळे चिखल साचत असल्यास त्याची चौकशी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी.