मुंबई/पुणे/लासलगाव/वार्ताहर
भारतीय हवामान खात्याने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा खरा ठरवत राज्याच्या विविध भागात पावसाने ‘कहर’ केला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही भागांत मंदिरे, पूल, रस्ते आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. पुण्यात पावसाने जोर धरला असून हवामान विभागाकडून पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला. खडकवासला पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने पुन्हा या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पुण्यात नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर प्रशासनही अलर्ट मोडवर आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीपात्रातील मंदिरांसह शेजारील खंडेराव मंदिर, हेगडी प्रधान मंदिर स्मशानभूमी आदी पाण्याखाली गेले आहे, तर गोदावरी नदीच्या कडेला असलेल्या चांदोरी, सायखेडा आणि करंजवन या गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गंगापूर धरणातून विसर्ग सुरू
नाशिक शहर व परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे गोदाघाटावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरले पाणी
त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांना नद्यांचे रूप आले आहे. मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या पायऱ्यांवरून मंदिर परिसरात पाणी शिरले. यामुळे दक्षिण दरवाजाजवळील गायत्री मंदिर पाण्याखाली गेले. यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली. उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणाच्या आदल्या दिवशीच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या नगरीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
दरम्यान, गंगापूर धरणातून दुपारी १२ वाजता ५०० क्युसेक्सने, तर दुपारी ३ वाजता एक हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
पुण्यात मुळा-मुठा नदीवरील बंधारे पाण्याखाली
पुणे शहर परिसर आणि धरण क्षेत्र परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रविवारी दुपारच्या सुमारास मुळा-मुठा आणि भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले. मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ होत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
एकता नगरमधील नागरिकांना लष्कराने सुरक्षितस्थळी हलवले
पुण्यातील सिंहगड रोड भागातील एकता नगर परिसरात रविवारी सकाळपासूनच लष्कर दलाचे जवान तैनात होते. खडकवासलातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर एकता नगर भागात पुन्हा एकदा पाणी भरायला सुरुवात झाली. भारतीय लष्करी जवानांनी अतिशय सुरळीतपणे पार पाडले आहे. या जवानांनी काळजीपूर्वक या परिसरात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीचे सुरक्षित स्थळावर स्थलांतर केले.
इगतपुरीत २४० मिमी पावसाची नोंद
पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात २४ तासांत २४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
उजनी धरण वाहू लागले
पुणे, सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव, अहमदनगर जिल्ह्याची तहान भागवणारे उजनी धरण भरून वाहू लागले आहे. उजनीच्या वरील बाजूकडील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे पूरनियंत्रणासाठी भीमा नदीपात्रात २० हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू केला. गरज पडल्यास विसर्गात वाढ केली जाऊ शकते. उजनी धरणात दौंड येथून मोठी आवक होत आहे. उजनी धरण पूरनियंत्रण कक्षाकडून भीमा नदी काठच्या सर्व नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रामकुंडातून युवक गेला वाहून
रामकुंडाजवळ पुराच्या पाण्यातून एक यग्नेश पवार (२९) हा तरुण व तीन वर्षांची मुलगी वाहून गेल्याची घटना घडली. मुलीला वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले आहे, तर यग्नेश पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. यग्नेश हा महावितरणमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत असून भुसावळ येथे नेमणूक होती. नीलकंठेश्वर मंदिर येथे कालसर्प योग पूजेनिमित्त आला असता गोदावरी नदीत पूजन करताना पाय घसरून नदीत पडल्याने तो वाहून गेला. यावेळी आईच्या डोळ्यादेखतच आपला मुलगा वाहून गेल्याने तिने एकच टाहो फोडला होता. त्याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे.