नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषिक लोकांविरुद्ध हिंसाचार भडकवण्याचा आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली असून त्यामध्ये राज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्ती आणि मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यांवरून चांगलाच वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून मनसे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपही रंगल्याचे पाहायला मिळाले. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईत एक मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यातही राज ठाकरे यांनी मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यावरून गंभीर इशारा दिला होता.
...तर दणका बसणार
त्यानंतर शुक्रवारी राज ठाकरे यांची ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेतही ते हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आणि मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यांवरून चांगलेच आक्रमक झाले होते. मराठी व्यापारी नाही आहेत का, महाराष्ट्रात राहताय, मराठी शिका, नीट व्यापार करा. मस्ती दाखवलीत तर दणका बसणार म्हणजे बसणार, असा इशारा राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना दिला.
कारवाईची मागणी
त्यानंतर राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या याचिकेत राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी हिंदी भाषिक लोकांविरुद्ध हिंसाचार भडकवण्याचा आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
दरम्यान, वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत महाराष्ट्रात भाषा वादावरून तणाव वाढविण्याच्या कथित सहभागाबाबत राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. भाषेच्या मुद्द्यांवरून मनसे कार्यकर्त्यांनी काही परप्रातियांना मारहाण केल्याची घटना घडली होती. विशेषतः मराठी न बोलणाऱ्यांना लक्ष्य केल्याच्या घटना घडल्यानंतर हे कायदेशीर पाऊल उचलण्यात आले आहे.
पोलीस महासंचालकांकडेही तक्रार
राज ठाकरे यांच्याविरोधात पोलीस महासंचालकाकडे तीन वकिलांनी काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. या तक्रारीत राज ठाकरे यांचे काही विधाने सामाजिक अशांततेला प्रोत्साहन देणारे असल्याचे म्हटले होते. राज ठाकरे यांनी भाषणात केलेल्या परप्रांतीयांबाबतच्या विधानामुळे राज्यातील सामाजिक सलोखा आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.