राजन साळवी, उद्धव ठाकरे (डावीकडून)  
महाराष्ट्र

राजन साळवींचा उपनेतेपदाचा राजीनामा; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदे गटात आज पक्षप्रवेश

एसीबीचे मागे लागलेले शुक्लकाष्ठ तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावे लागलेले रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी बुधवारी शिवसेना ठाकरे पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

Swapnil S

मुंबई : एसीबीचे मागे लागलेले शुक्लकाष्ठ तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावे लागलेले रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी बुधवारी शिवसेना ठाकरे पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता राजन साळवी हे गुरुवारी दुपारी ३ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे त्यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू घेतल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. यामुळे आतापर्यंत एकनिष्ठ असलेल्या साळवी यांनी शिवसेनेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. पराभवानंतर नाराज झालेले राजन साळवी हे भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा होती. मात्र त्यांनी शिंदे गटाची कास धरण्याचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी यांच्या जाण्याने ठाकरे गटाला कोकणात मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळा आमदार, आता उपनेता अशा विविध पदांवर काम केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या मोजक्या आमदारांमध्ये राजन साळवी यांचा समावेश होता. त्यांच्या राजीनाम्याने उद्धव ठाकरेंची कोकणातील ताकद कमी होणार असून शिंदे सेनेची ताकद वाढणार आहे. लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजापूर मतदारसंघात राजन साळवी यांना शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. राजन साळवी आणि त्यांच्या पत्नीच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (एसीबी) ससेमिरा लागला होता. तरीही राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन