विजय पाठक/ जळगाव
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी ४८० अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीची ही प्रक्रिया आठ तासात आटोपण्याची अपेक्षा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली.
बुधवार दि. २० नोव्हेंबरला जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. त्याचबरोबर मतदानाचा टक्का देखील मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत वाढला. ६५ टक्केहून अधिक मतदान झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत शनिवारी ११ विधानसभा क्षेत्रात मतमोजणी होणार असून मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले. जळगाव शहर मतदारसंघात २९ उमेदवार असल्याने जळगाव शहर वगळता अन्य मतदारसंघात प्रत्येकी १४ मतमोजणी पर्यवेक्षक १४ सहाय्य्क १४ सूक्ष्मनिरीक्षक असतील तसेच राखीव अधिकारी व कर्मचारी देखील नियुक्त केले गेले आहेत. जळगाव शहरासाठी २० टेबल राहणार आहेत. दुपारी चारपर्यंत सर्व मतदार केंद्रांचे निकाल आलेले असतील, असे आशुष प्रसाद यांनी सांगितले. मतमोजणीसाठी आणि निकालानंतरही जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था हावी म्हणून जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
धुळे जिल्ह्यात देखील पाचही विधानसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी महादेच खेडकर यांनी दिली. मतमोजणीसाठी एकूण १४ टेबल लावण्यात आले असून पोस्टल मतमोजणीसाठी सहा टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात होईल, असे खेडकर यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यात ६५.४७ टक्के मतदान
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न केल्याने धुळे जिल्ह्यात देखील मतदानाची टक्केवारी वाढली आहे. धुळे जिल्ह्यात यापूर्वी ६१ टकके मतदान झाले होते. यावेळी ते ६५.४७ टक्के झालेले आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील टक्केवारी पुढीलप्रमाणे साक्री – ६५.६२, धुळे ग्रामीण – ६९.९६, धुळे शहर – ५९.७०, शिंदखेडा – ६५.८ , शिरपूर -६५.७५, ६ लाख १८ हजार ७२० पुरूष मतदार आणि ५ लाख ८० हजार २१९ महिला मतदार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून पुरुषांची टक्केवारी ६६.०५ तर महिलांची मतदानाची टक्केवारी ६४.८७ टक्के आहे. जिल्ह्यात ६५.४७ टक्के मतदान झाले.