महाराष्ट्र

'या रीलमध्ये चुकीचं काय?' रोहित पवारांकडून अथर्व सुदामेची पाठराखण; 'तो' व्हिडिओही पुन्हा केला शेअर

"या रीलमध्ये चुकीचं काय आहे? हे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगावं अन्यथा...

Krantee V. Kale

गणेशोत्सवानिमित्त हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा रील व्हिडिओ शेअर केल्याच्या रागातून पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे याच्यावर ब्राह्मण महासंघाने आणि काही नेटकऱ्यांनी टीकेचा प्रचंड भडीमार केला. परिणामी, काही तासांतच अथर्वला व्हिडिओ डिलीट करीत जाहीर माफी मागावी लागली. आता मात्र यावर राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सुदामेची पाठराखण केली आहे. शिवाय, सुदामेने डिलिट केलेला रील व्हिडिओ देखील रोहित पवारांनी पुन्हा शेअर केला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून रोहित पवार यांनी अथर्वची बाजू घेतली आहे. "अथर्व सुदामे हा एक गुणी क्रिएटर आहे. त्याने बनवलेल्या गणपती बाप्पाच्या रिलमध्ये काहीएक आक्षेपार्ह नाही, उलट हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश या रिलमधून दिला जात असेल तर हिंदू धर्म-संस्कृतीला ते साजेसंच आहे. परंतु सामाजिक एकोप्याला विरोध असलेल्या मनुवादी प्रवृत्तीने ट्रोल केल्याने त्याला हे रिल डिलीट करण्याची वेळ आली. या रिलमध्ये चुकीचं काय आहे? हे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगावं अन्यथा ट्रोल करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात… अथर्व सुदामे यानेही ट्रोलरला न घाबरता बेडरपणे पुढं यायला हवं, कारण मराठी माणूस हा घाबरणारा नाही तर लढणारा असतो..!", असे रोहित पवार म्हणाले. त्यानंतर अजून एक पोस्ट करीत, "आपल्या सर्वच संतांनी दिलेली बंधुता आणि सामाजिक एकात्मतेची शिकवण अथर्व सुदामे याच्या या रिलमधून बघायला मिळते. मला अत्यंत आवडलेलं हे रिल मी शेअर करतोय…" असे म्हणत त्यांनी सुदामेने डिलिट केलेला व्हिडिओही शेअर केला.

अक्कल शिकवू नकोस-

व्हिडिओ समोर येताच ब्राह्मण महासंघाने अथर्व सुदामेला लक्ष्य केले होते. सुदामेने केवळ मनोरंजन करावे, अभ्यास नसलेल्या विषयाबद्दल बोलू नये. तू फक्त तुझा करमणुकीचा धंदा कर आणि तेवढ्यापुरता तुझा धंदा मर्यादित ठेव, असे ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे म्हणाले होते. "अथर्व सुदामेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो हिंदू-मुस्लिम ऐक्याची काहीतरी अक्कल शिकवतोय. दूधात टाकलेली साखर ही साखरेचे काम करतेय की विषाचे काम करतेय, हे गेल्या ७००-८०० वर्षांपासून हिंदू भोगत आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की तू करमणूक कर, लोकांना हसव आणि स्वत:चं पोटभर. यापेक्षा वेगळ्या काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नकोस", असे म्हणत दवे यांनी सुदामेवर प्रखर टीका केली होती. त्यानंतर अथर्वने कोणाला दुखावण्याचा किंवा कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता, असे म्हणत जाहीर माफी मागितली.

डिलिट केलेल्या व्हिडिओमध्ये काय होतं?

गणेशोत्सवानिमित्त बनवलेल्या रीलमध्ये अथर्व बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी मूर्तीकाराकडे जातो. कारखान्यातील अनेक मूर्त्यांपैकी एक मूर्ती तो निवडतो. त्याचवेळी मूर्तीकाराचा मुलगा 'अब्बू' हाक मारत तेथे येतो आणि 'अम्मी ने आप के लिये खाना भेजा है', असे सांगतो. आता ग्राहक (अथर्व) आपल्याकडून मूर्ती खरेदी करणार नाही असा मूर्तीकाराचा समज होतो. त्यामुळे, पुढेपण मूर्तीचं दुकान आहे, तुम्ही तिथूनही मूर्ती घेऊ शकतात असे मूर्तीकार म्हणतो. पण, मला येथून मूर्ती घेण्यास काहीच समस्या नाही, असे अथर्व मूर्तीकाराला सांगतो. इथून मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला? असे मूर्तिकार पुन्हा त्याला विचारतो. त्यावर, तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे असे सांगताना "माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावे जी शेवयांची खीरही गोड बनवते आणि शीरखुर्माही. आपण वीट व्हावे जी मंदिरसुद्धा उभारते आणि मशिदसुद्धा", असा अथर्वचा संवाद होता.

राज्यभर पुन्हा मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर पावसाचे सावट

आझाद मैदानात उपोषण करण्यास HC ची मनाई; पण जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम; म्हणाले - "कोर्ट आम्हाला १०० टक्के...

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटलांना हायकोर्टाचा धक्का; परवानगीशिवाय आझाद मैदानात उपोषणास मनाई

विवाहित लेकीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पकडले; बापाने दोघांनाही विहिरीत ढकलून संपवले, धक्कादायक घटनेने नांदेड हादरले

UPS to NPS : पेन्शन स्कीमबाबत सरकारची मोठी घोषणा; 'यूपीएस'मधून 'एनपीएस'मध्ये एकदा बदलाची परवानगी