२ कोटी मतदार वगळणार? राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांचा आक्षेप (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

२ कोटी मतदार वगळणार? राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांचा आक्षेप

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनर्विलोकन (एसआयआर) मोहिमेदरम्यान २ कोटींहून अधिक मतदारांचे गणती फॉर्म गोळा होऊ शकलेले नाहीत, अशी अधिकृत माहिती सोमवारी प्रसिद्ध केली.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनर्विलोकन (एसआयआर) मोहिमेदरम्यान २ कोटींहून अधिक मतदारांचे गणती फॉर्म गोळा होऊ शकलेले नाहीत, अशी अधिकृत माहिती सोमवारी प्रसिद्ध केली. हे मतदार अनुपस्थित होते, मृत झाले आहेत किंवा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत, असे या माहितीत म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार यादीतून २ कोटींहून अधिक नावे ‘वगळण्याबाबत’ तीव्र आक्षेप घेतला.

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ९,७८,५४,०४९ मतदार आहेत. यापैकी ७,६९,५२,२६२ मतदारांच्या (७८.६४ टक्के) फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे, तर २,०७,९३,९१६ मतदारांचे (२१.२५ टक्के) फॉर्म गोळा होऊ शकले नाहीत; कारण हे मतदार अनुपस्थित होते, मृत झाले होते, स्थलांतरित झाले होते किंवा त्यांची नावे दुबार होती.

निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात १,००,२५३ बीएलओ तैनात केले. एसआयआर डिजिटायझेशनचे ९९.८९ टक्के काम पूर्ण झाले आहे.

महाराष्ट्रातील ३६ पैकी १४ जिल्ह्यांमध्ये ‘एसआयआर’चे १०० टक्के काम पूर्ण झाले असून, मुंबईतील दोन जिल्ह्यांमध्ये सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिजिटायझेशनची प्रक्रिया पुढेही सुरू राहील आणि अंतिम आकडेवारी सोमवारी उशिरा संध्याकाळी किंवा मंगळवारपर्यंत येण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी प्रारुप मतदार यादीतून नावे कोणत्या आधारावर वगळली जाऊ शकतात, यावर आक्षेप नोंदवला. ज्या मतदारांची माहिती अपूर्ण आहे किंवा ज्यांच्या नावांत बदल झाला आहे, त्यांच्या छाननीनंतर हा आकडा आणखी वाढू शकतो, असा दावा त्यांनी केला.

पवार म्हणाले की, वगळलेल्या नावांमध्ये सुमारे ३४ लाख मतदार मृत दाखवले आहेत, ७६ लाख कुटुंबांशी संपर्क होऊ शकलेला नाही आणि ७७ लाख मतदारांनी आपला पत्ता कायमचा बदलला आहे, अशी माहिती त्यांना देण्यात आली. तसेच सुमारे दोन लाख लोकांनी माहिती देण्यास नकार दिल्याचा दावाही त्यांनी केला.

अनुपस्थित मतदारांसह ज्यांची नावे यादीतून वगळली गेली आहेत, ते मतदार यादीत पुन्हा नावाचा समावेश करण्यासाठी ‘फॉर्म ६’ सादर करू शकतात, असे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पवार यांनी सांगितले. पडताळणीनंतर वगळलेली काही नावे पुन्हा समाविष्ट केली जाऊ शकतात.

बीएलओंवर ही पडताळणी वेळेत पूर्ण करण्यासाठी दबाव असल्याचा दावाही आमदारांनी केला. काही ठिकाणी ‘टेबल सर्व्हे’ केले जात असून, भाजप कार्यकर्त्यांकडून ही माहिती पुरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

...तर यादीत नाव समाविष्ट होणार

प्रारुप मतदार यादी संबंधित जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळांवर अपलोड केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मतदार आपले नाव तपासू शकतील आणि नाव नसल्यास ते समाविष्ट करण्यासाठी 'फॉर्म ६' भरू शकतील.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मंत्रालयातील चेहरा पडताळणी यंत्रणेचा बोजवारा; ४१ कोटी रुपयांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत बुडून बहिणींचा मृत्यू

एमडीची ‘डिलिव्हरी’ होण्याआधीच दणका; कोपरीत २.३० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त, गोवंडीतील तरुण पोलिसांच्या जाळ्यात

माथेरानचा एकमेव रस्ता ठरतोय पर्यटकांसाठी ‘कोंडीचा सापळा’; नेरळ-माथेरान ८ किमीच्या प्रवासाकरिता ५-६ तासांची प्रतीक्षा

टाटा सन्सची AGM आज होणार नाही! वार्षिक सर्वसाधारण सभा तहकूब होण्याची शक्यता