अनिल परब यांचे संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

बदल्यांसाठी ५० लाख मागणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई? अनिल परब यांचा विधान परिषदेत सवाल

राज्यातील आरटीओत अतिरिक्त बदलीसाठी ५० लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आयुक्त भरत कळसकर याच्याविरोधात कोणती कारवाई करणार असा सवाल शिवसेना (उबाठा) अनिल परब यांनी विधान परिषदेत केला.

Swapnil S

मुंबई : राज्यातील आरटीओत अतिरिक्त बदलीसाठी ५० लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आयुक्त भरत कळसकर याच्याविरोधात कोणती कारवाई करणार असा सवाल शिवसेना (उबाठा) अनिल परब यांनी विधान परिषदेत केला.

विधान परिषदेत परब म्हणाले की, आरटीओतील अतिरिक्त आयुक्त भरत कळसकरने ३३१ अधिकाऱ्यांकडे बदल्यांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये मागितले, त्यापैकी २४५ अधिकाऱ्यांनी त्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. भरत कळसकर याने बनावट कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्याचा आरोपही परब यांनी केला. या भ्रष्ट अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार असा प्रश्नही विचारला.

भरत कळसकर हा अधिकारी त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना काम कसे करायचे हे सांगतो. आतापर्यंत त्याने ६०० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे सांगतो. माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे, असं तो सांगतोय. आता हे ब्रह्मास्त्र कोण आहे याची माहिती समोर आणा, अशी मागणी परब यांनी केली.

परब म्हणाले की, '३३१ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी भरत कळसकर याने प्रत्येकी ५० लाखांची मागणी केली. त्यापैकी पहिले १० लाख द्या, मग बदली करतो, असे तो म्हणाला. त्यापैकी २४५ अधिकाऱ्यांनी त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. याची माहिती मंत्र्यांना नाही हे मला माहिती आहे. या २४५ तक्रारींची चौकशी करा आणि त्याच्यावर काय कारवाई करायची ते हे सांगा, असे ते म्हणाले.

परब म्हणाले की, 'कळसकर इतर अधिकाऱ्यांना म्हणतोय की त्याला कोणीही रोखू शकत नाही. माझ्याकडे आमदार, खासदार पत्र पाठवत असतात. मी ते पत्र कचऱ्याच्या टोपलीत टाकतो. मी अंधेरीत बोगस परवाने दिली. माझे आता केवळ ७ महिने राहिले आहेत. अधिवेशनाच्या काळात आरोप प्रत्यारोप होत असतात, मात्र मी अतिरेकी आहे मला कोणी रोखू शकत नाही, असे तो अधिकारी म्हणतोय.'

कळसकरबद्दल बोलताना परब म्हणाले की, 'तो अधिकारी इतरांना सांगतोय की, तुम्ही काही काम करू नका. कोणाला कुठे कुठे जायचं आहे, ते तुम्ही मला सांगा, मी करेन. मी ६०० लोकांचे प्रमोशन केलंय. दोन प्रोजेक्ट केलेत. तुम्हाला मी मोठे करतो. माझ्या तक्रारी होतात, पण मला त्याचं काही नाही. माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे. मला जे करायचं आहे ते मी करतो, असे त्यांनी सांगितले.

बनावट कंपन्यात पैसा गुंतवतो

परब म्हणाले की, 'या अधिकाऱ्याने काही बनावट कंपन्या बनवल्या आहेत. फक्त नोंदणी केलेल्या ३ कंपन्या आहेत. या कंपन्यांचे व्यवहार झालेले नाहीत, मग पैसे आले कुठून ? हे काळे पैसे बनावट कंपनीत टाकून बाहेर येतात, असा दावा परब यांनी केला. या अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार आहात? मी आज एवढे पुरावे दिले आहेत, त्यामुळे याची चौकशी तुम्ही लावणार आहात का ? जर मंत्र्यांनी त्याला वाचवलं तर मला नाईलाजाने म्हणाव लागेल की हे सगळं मंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे.', अशी टीका त्यांनी केली.

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप

BMC निवडणुकांआधी ठाकरेंना धक्का; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, "नाती बदलू शकतात, पण...

आठवडाभरात मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार; २४ वॉर्डांत निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती; आयुक्तांची माहिती

सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Mumbai : क्रीडापटूंवर एकाच छत्राखाली उपचाराची सुविधा; पर‌ळच्या केईएम रुग्णालयात स्वतंत्र क्रीडा वैद्यकीय विभाग