मुंबई : धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी वर्षभरात १७७ फोन कॉल केल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी केला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खरातशी याच काळात १७ वेळा फोनवरून संपर्क साधल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. खरातप्रकरणी चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्याने रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
दमानिया यांनी शुक्रवारी समाज माध्यमांमध्ये स्वतःचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. मागील वर्षभरातील कथित कॉल डिटेल रेकॉर्डच्या (सीडीआर) आधारे त्यांनी कोणते राजकीय नेते अशोक खरातच्या संपर्कात होते आणि त्यांनी किती वेळा खरातला कॉल केले, याची माहिती दमानिया यांनी उघड केली आहे. रुपाली चाकणकर यांच्या बहिणीनेही अशोक खरातला तब्बल २३६ वेळा कॉल केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
खरात कन्या तृप्तबालालाही चाकणकरांचे कॉल
आपल्याला एका अनोळखी व्यक्तीकडून अशोक खरातचा सीडीआर प्राप्त झाला. या रेकॉर्डमध्ये अनेक राजकीय नेत्यांशी झालेल्या संवादाचा तपशील असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. त्यांच्या दाव्यानुसार चाकणकर यांनी वर्षभरात अशोक खरातला तब्बल १७७ वेळा कॉल केले. या दोघांमध्ये एकूण ३३ हजार ७२७ सेकंद, म्हणजेच सुमारे ९ तास ३६ मिनिटे संभाषण झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय खरातची कन्या तृप्तबाला खरातलाही चाकणकर यांनी कॉल केल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील, तटकरे, शेलार, केसरकरही संपर्कात
या प्रकरणात दमानिया यांनी अनेक इतर राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे यांनी १७ वेळा, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्येकी ८ वेळा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी एकदा अशोक खरातशी संपर्क साधला आहे. दमानिया यांनी माजी मंत्री दीपक केसरकर यांचेही नाव घेतले आहे.
खरातच्या पत्नीविरोधात लूकआऊट नोटीस
भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरात फरार असल्याने तपास अधिकच वेगाने सुरू झाला आहे. लूकआऊट नोटीस जारी केल्यानंतर ‘एसआयटी’ने थेट माहेरी धडक देत चौकशी केली आणि त्यातून समोर आलेल्या माहितीने तपासाला नवे वळण मिळाले आहे. कल्पनाचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक सक्रिय झाले असले तरी दोन दिवस उलटूनही कल्पना सापडली नसल्याने तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. याचदरम्यान ‘एसआयटी’ने खरात कुटुंबातील सदस्यांवर लक्ष केंद्रित करत चौकशीचा वेग वाढवला आहे. खरातचा मुलगा हर्षवर्धन याची पुन्हा चौकशी करण्यात आली असून, कल्पनाचे दोन भाऊ यांचीही तपास पथकाने विचारपूस केली आहे.
‘एसआयटी’चे पथक सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील कल्पना खरातच्या माहेरी पोहोचले. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, कल्पना खरात गेल्या १६ वर्षांपासून माहेराशी संपर्कात नाही. इतकेच नव्हे, तर खरात तिला माहेरी येऊ देत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. लग्नानंतर कल्पनाने माहेराशी फारसा संबंध ठेवला नव्हता, तसेच तिचा भाऊसुद्धा तिला भेटू शकला नसल्याचे सांगण्यात आले. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती साधी असून, ते अल्पशेतीवर उदरनिर्वाह करत असल्याची माहितीही हाती आली आहे.