मुंबई : केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) महासंचालक सदानंद दाते यांची त्यांच्या मूळ महाराष्ट्र कॅडरमध्ये प्रतिनियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२६ पासून महाराष्ट्राचे भावी पोलीस महासंचालक (डीजीपी) म्हणून त्यांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना राज्य सरकारने दिलेली दोन वर्षांची मुदतवाढ ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. नव्या पोलीस प्रमुखाच्या नियुक्तीपूर्वी महाराष्ट्र सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे उमेदवारांची यादी पाठवली होती. त्यात दाते हे सर्वाधिक वरिष्ठ अधिकारी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग तीन नावे सुचवेल आणि त्यातून राज्य सरकार अंतिम निवड करेल. गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, दाते यांच्या प्रतिनियुक्तीस केंद्राची मंजुरी मिळाल्याने त्यांच्या नियुक्तीवरील अडथळा दूर झाला आहे.
१९९० च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी
सदानंद दाते राज्याचे पोलीस महासंचालक झाल्यास, त्यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२७ पर्यंत असेल. पुणे येथे १४ डिसेंबर १९६६ रोजी जन्मलेले सदानंद दाते १९९०च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर एनआयएचे प्रमुख आहेत. प्रामाणिक, कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून दाते यांची ओळख असून, सेवाज्येष्ठतेनुसार ते सर्वाधिक वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘ब्लॅक कॅट’ कमांडोनी विविध ऑपरेशन्स यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. त्याचबरोबर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास, फरीदाबाद डॉक्टर दहशतवादी मॉड्युलचा तपास आणि २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला भारतात आणण्यासाठी सदानंद दाते यांनी मोलाची भूमिका बजावली होती. राज्य सरकारने यूपीएससीकडे सात अधिकाऱ्यांची यादी पाठवली आहे. त्यात दाते यांच्यासह महासंचालक (कायदेशीर व तांत्रिक) संजय वर्मा, होम गार्ड्स कमांडंट रितेश कुमार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजीव कुमार सिंघल, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या महासंचालक अर्चना त्यागी, नागरी संरक्षण महासंचालक संजीव कुमार; तसेच रेल्वेचे महासंचालक प्रशांत बुरडे यांचा समावेश आहे.