सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या १०; ‘राणोजी’ या दहाव्या वाघोबाची नोंद 
महाराष्ट्र

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या १०; ‘राणोजी’ या दहाव्या वाघोबाची नोंद

पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेने समृद्ध असा महत्त्वाचा प्रदेश मानल्या जाणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघसंख्येत उत्साहवर्धक वाढ झाली आहे.

Swapnil S

कराड : पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेने समृद्ध असा महत्त्वाचा प्रदेश मानल्या जाणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघसंख्येत उत्साहवर्धक वाढ झाली आहे. नुकत्याच नोंद झालेल्या ‘रायबा’ (एसटीआर-०७) आणि ‘सरदार’ (एसटीआर-०८) या प्रौढ वाघांनंतर आता ‘राणोजी’ (एसटीआर-१०) या नव्या वाघाची अधिकृत नोंद वन विभागाने केली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील वाघांची एकूण संख्या आता १० वर पोहोचली आहे.

या दहामध्ये सात नर आणि तीन मादी वाघांचा समावेश असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. कॅमेरा ट्रॅप्स, पगमार्क्स आणि वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारे ‘राणोजी’ची ओळख निश्चित करण्यात आली आहे. सध्या ‘राणोजी’ राधानगरी परिसरात स्वतःची स्वतंत्र हद्द (टेरिटरी) निर्माण करत असल्याचे निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.

सावंतवाडी-दोडामार्ग ते राधानगरी हा नैसर्गिक वन्यजीव कॉरिडॉर वाघांच्या मुक्त संचारासाठी महत्त्वाचा ठरत असून, त्यामुळे त्यांची जनुकीय विविधता जपली जात आहे आणि दीर्घकालीन संवर्धनाला बळ मिळत आहे. वन विभागाकडून वाघांच्या हालचाली, अधिवास, पाणवठे आणि अन्नसाखळी यांचा सखोल अभ्यास सुरू असून, भविष्यातील व्यवस्थापन आराखड्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार या प्रकल्पात ठरावीक संख्येने वाघांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

वाघ संवर्धन प्रयत्नांना यश

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी, रायबा, सरदार, शिलेदार आणि राणोजी असे एकूण दहा वाघांची ओळख पटली आहे. वाढती संख्या आणि स्थिर अधिवास यामुळे या प्रकल्पातील वाघ संवर्धन प्रयत्नांना यश मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. राधानगरी अभयारण्यात आणखी मादी वाघीण सोडल्यास वाघांची नैसर्गिक वाढ अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच नियोजनबद्ध पर्यावरणपूरक पर्यटन (इको-टुरिझम) विकसित केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात, असेही मत व्यक्त होत आहे.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती