सोलापूर : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांसह अन्य संतांच्या पालख्यांनी बुधवारी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. दसुर जवळ मावळतीला पावसाच्या सरी झेलत माऊली व संत सोपान काका यांच्या बंधू भेटीचा अपूर्व सोहळा पार पडला.
दरम्यान राज्यभरातून आषाढी सोहळ्यासाठी येत असलेले पालखी सोहळे व दिंड्या या पंढरपूर तालुक्यात दाखल झाल्या आहेत. वेळापूरचा मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भंडीशेगाव मुक्कामासाठी पंढरपूर तालुक्यात पोहोचली. वाटेत माळशिरस तालुक्यातील ठाकूरबुवांच्या समाधी जवळ मोठ्या भक्तीमय वातावरणात गोल रिंगण झाले. तर पिराची कुरोली येथील टप्पा परिसरातील दसुर पाटीजवळ सासवड येथून आलेल्या संत सोपानदेव यांच्या पालखी सोहळ्याची भेट माऊलींच्या पालखीसोबत झाली. हा बंधू भेटीचा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
त्यापूर्वी दुपारी संत सोपान देव, संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा बोंडले येथून दसुरकडे मार्गस्थ झाला होता.सोपानदेव पालखी, संत तुकाराम महाराज पालखी तसेच संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दुपारी दसुरपाटी येथे पोहोचली. ग्रामस्थांच्यावतीने या सोहळ्याचे मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. सर्व संतांचे पालखी सोहळे मुक्कामासाठी पंढरपूर नजीक वाखरी या ठिकाणी येणार आहेत.
तत्पुर्वी वाटेत बाजीराव विहीर येथे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे गोल रिंगण तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उभे रिंगण पार पडणार आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने या दोन्ही रिंगण सोहळ्यांची तयारी करण्यात आली आहे.जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली या ठिकाणी मुक्कामासाठी गेली. तर संत सोपान देव,संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळे मुक्कामासाठी सायंकाळी भंडीशेगाव येथे पोहोचले होते.
वेळापूर येथील ठाकूरबुवा समाधी जवळ भर पावसात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण पार पडले. चिखलातच वारकऱ्यांचे खेळ रंगले. पोलिसांनीसुद्धा रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला.