स्वीटी भागवत/मुंबई :
महाराष्ट्रातील सर्वांत लांब प्रवेश-नियंत्रित द्रुतगती मार्ग असलेल्या समृद्धी महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी जवळपास ४ हजार कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित कॅमेऱ्यांची उभारणी सुरू झाली आहे.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) प्रकल्पांतर्गत हे कॅमेरे बसविण्यात येत आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वेगमर्यादा ओलांडणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर, अनधिकृत पार्किंग, क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक, सीट बेल्ट न लावणे तसेच लेन शिस्तीचे उल्लंघन यांसह १७ प्रकारच्या वाहतूक नियमभंगांची स्वयंचलित नोंद केली जाणार आहे.
या आयटीएमएस प्रकल्पाचा अंदाजे खर्च १,७०० कोटी रुपये असून, आतापर्यंत राज्य सरकारकडून सुमारे ४५० कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे.
एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून ऑप्टिकल फायबर आणि विद्युत केबल टाकणे तसेच कॅमेरे बसविण्यासाठी गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू होते. त्यानंतर आता कॅमेरे प्रत्यक्ष बसविण्याच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. संपूर्ण महामार्गावर टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात येत आहे.
कॅमेरे बसविण्याचे काम २५० किलोमीटरच्या सलग टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. नागपूरच्या दिशेने या कामाला सुरुवात झाली असून, पहिला २५० किलोमीटरचा टप्पा पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढील टप्प्यातील काम हाती घेतले जाणार आहे.
राज्य सरकारने या प्रकल्पाला उच्च प्राधान्य दिले असून, आयटीएमएस लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी एमएसआरडीसीकडून युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
आयटीएमएस ही तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा असून, तिच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा वाढविणे, वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि अपघात अथवा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. एआयवर आधारित कॅमेऱ्यांमुळे केवळ मनुष्यबळावर अवलंबून न राहता विविध प्रकारच्या वाहतूक नियमभंगांची स्वयंचलितपणे नोंद करता येणार आहे.
या यंत्रणेमुळे महामार्गावरील वाहतुकीवर अधिक प्रभावी देखरेख ठेवण्याबरोबरच अपघात किंवा अन्य घटनांचे व्यवस्थापन अधिक वेगाने करता येईल. वाहनचालकांची सुरक्षितता, आपत्कालीन प्रतिसादाला गती, वाहतूक नियमांची अंमलबजावणी आणि टोल व्यवस्थापनात अधिक स्वयंचलितता आणणे हा या प्रकल्पाचा व्यापक उद्देश आहे.
आमणे येथे मुख्य नियंत्रण केंद्र
आयटीएमएसचे संचालन वाहतूक व्यवस्थापन केंद्रांच्या नेटवर्कच्या माध्यमातून केले जाणार आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील आमणे येथे एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन केंद्र उभारण्यात येणार आहे. याशिवाय महामार्गावर साधारण १०० किलोमीटरच्या अंतराने सात प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापन केंद्रे तसेच दोन बोगदा वाहतूक व्यवस्थापन केंद्रे असतील. या संपूर्ण यंत्रणेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक नियंत्रण, नियमभंगाची नोंद, अपघात व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षेला मोठी मदत होण्याची अपेक्षा आहे.
लुटीच्या घटनांनंतर सुरक्षेलाही प्राधान्य
समृद्धी महामार्गावरील काही ठिकाणी लुटीच्या दोन घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे या देखरेख यंत्रणेच्या उभारणीला अधिक वेग आला आहे. विस्तारित कॅमेरा नेटवर्कमुळे महामार्गावरील संवेदनशील आणि निर्जन भागांवर अधिक प्रभावी नजर ठेवणे तसेच संशयास्पद हालचालींचे निरीक्षण करणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
जुलै २०२४ मध्ये कंत्राट
आयटीएमएस प्रकल्पाचे कंत्राट जुलै २०२४ मध्ये एनसीसी लिमिटेडच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमला देण्यात आले होते. मात्र, प्रकल्पाच्या कामाला विलंब झाला. आता कामाला वेग देण्यात आला असून, हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.