महाराष्ट्र

सांगलीत अग्नितांडव! भीषण आगीत एकाच घरातील चौघांचा होरपळून मृत्यू, ३ वर्षाच्या चिमुकीलीचाही करुण अंत

सांगलीतील विटा येथे सोमवारी (दि. १०) सकाळी भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सावरकरनगरमधील जय हनुमान स्टील सेंटर या भांडी व फर्निचर विक्री करणार्‍या दुकानात अचानक आग लागली.

नेहा जाधव - तांबे

सांगलीतील विटा येथे सोमवारी (दि. १०) सकाळी भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सावरकरनगरमधील जय हनुमान स्टील सेंटर या भांडी व फर्निचर विक्री करणार्‍या दुकानात अचानक आग लागली. क्षणात ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. इमारतीत राहणारे दुकानमालक विष्णू जोशी यांचे कुटुंब या आगीच्या विळख्यात सापडले.

या दुर्घटनेत दुकानमालक विष्णू पांडुरंग जोशी (वय ५०), पत्नी सुनंदा (वय ४५), विवाहित मुलगी प्रियांका इंगळे (वय २८) आणि नात सृष्टी इंगळे (वय ३) यांचा होरपळून मृत्यू झाला. तर, जोशी यांचे दोन मुलगे मनीष (वय २५) व सूरज (वय २२) यांना स्थानिक तरुणांनी वाचवले. ही आग दुकानातील फ्रीजच्या स्फोटामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

विटा येथे जय हनुमान स्टील सेंटर ही तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळाशी जोशी यांचे भांड्यांचे दुकान आणि पहिल्या मजल्यावर फर्निचर व गाद्यांचा साठा आहे. तर, त्यावरच्या मजल्यावर जोशी यांचे कुटुंब राहत होते.

बाहेर पडण्याचा रस्ता बंद झाला

आज सकाळी दुकानाचे शटर बंद असतानाच आतील भागात अचानक आग लागली. काही क्षणात धुराचे लोट बाहेर येऊ लागले आणि संपूर्ण इमारतीत आग पसरली. जोशी कुटुंब वरच्या मजल्यावर असल्याने त्यांचा बाहेर पडण्याचा रस्ता बंद झाला. जीन्याकडे आग आणि धुराचे लोट असल्याने कोणालाही खाली उतरणे शक्य झाले नाही. स्थानिक तरुणांनी मोठ्या मुश्किलने शेजारच्यां इमारतीच्या टेरेसमार्गे जोशी यांच्या दोन मुलांना बाहेर काढले. मात्र, उर्वरित चार सदस्य आतच अडकले. स्थानिकांनी भिंतीला वरून भगदाड पाडण्याचाही प्रयत्न केला; पण तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.

अग्निशमन दलाचे पाच तासांचे प्रयत्न

विटा नगरपालिकेसह कडेगाव, पलूस, कुंडल, तासगाव येथील अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अरुंद जागा आणि आजूबाजूची घरे एकमेकांना लागून असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. सुमारे ४ ते ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात दलाला यश आले, मात्र तोपर्यंत चौघांचे मृतदेह पूर्णतः जळालेल्या अवस्थेत सापडले.

अचानक लागलेल्या या आगीने एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. यामुळे विटा शहरावर शोककळा पसरली आहे. ही आग नेमकी कशी लागली याचा पोलिस तपास करत आहेत.

मोठी बातमी! अखेर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची युती; एकत्र लढणार कोल्हापूरची चंदगड नगरपंचायत

कल्याण-शिळफाटा मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून २० दिवस वाहतुकीत बदल, 'या' पर्यायी मार्गाचा वापर करा

मविआत फुट? काँग्रेस BMC निवडणूक स्वबळावर लढणार; विजय वडेट्टीवार म्हणाले, "मनसेसोबत...

राष्ट्रवादी काँग्रेसची प्रवक्तेपदाची यादी जाहीर; अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे यांना वगळले, वादग्रस्त विधान भोवले?

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला; १२२ जागांसाठी उद्या मतदान