महाराष्ट्र

"राज ठाकरे महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर...", संजय राऊतांची टीका

ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी वृत्तीने चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करून इच्छित असेल, मला असे वाटते प्रबोधनकार ठाकरे असतील, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला असेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली

Aprna Gotpagar

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी, १० मे रोजी पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा पार पडली. या सभेत, "हिंदूंनी महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतदान करा, असा मी 'फतवा' काढतो", असे राज ठाकरे म्हणाले. त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज, ११ मे रोजी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर हल्लाबोल केला. 'राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, तर, प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी', अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

"काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी, अशी महाराष्ट्राची स्थिती नाही. महाराष्ट्रात किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे. या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेले असताना, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन शीख, जैन, बौद्ध या देशातील सगळ्या जातीधर्माचे पंताचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत. मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, तर, प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. ज्या ठाकरे परिवाराने महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या संपूर्ण जीवनाचे समर्पन केले. मराठी माणसाला ताकद दिली. त्याच कुटुंबातील एक व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी वृत्तीने चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असेल, तर मला असे वाटते प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला असेल",अशी टीका राऊत यांनी राज ठाकरेंवर केली.

राज ठाकरे नेमके काय म्हणाले?

पुण्याच्या प्रचारसभेत राज ठाकरे म्हणाले, "तुम्ही मुस्लीम समाजाला काय समजता, ती तुमच्या घरची गुरे-ढोरे आहेत. त्यांनाही समजते की, काय चालले आहे आणि कोण आपल्याला वापरून घेते. बघा, निवडणुकीच्या तोंडावर फतवे काढले जात आहेत. काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा, मशिदीमधील मौलवी जर फतवे काढत असतील की, यांना मतदान करा म्हणून मग आज राज ठाकरे फतवा काढतो, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भागिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील...भाजप, शिंदे आणि अजित पवारांचे जे उमेदवार असतील...त्यांना भरघोस मतदान करा," असे राज ठाकरे म्हणाले.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली