मुंबई : एकीकडे महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात दुरावा निर्माण झाला असतानाच, दुसरीकडे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या शरद पवारांवरील टीकेनंतर बुधवारी महाराष्ट्रातील राजकारणही ढवळून निघाले. निमित्त ठरले ते नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आलेल्या पुरस्काराचे. सत्कार करताना पवार यांनी शिंदेंची स्तुती केल्याने संजय राऊत यांनी बुधवारी पवारांवरच आगपाखड केली आणि महाराष्ट्रात गाजला तो सत्कारकल्लोळचा प्रयोग.
“महाराष्ट्राचे राजकारण फार विचित्र दिशेने चालले आहे. कोण कोणाला टोप्या घालतंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय, तसेच कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वत: हीट विकेट होत आहे, हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते, ही आमची भावना आहे. महाराष्ट्रातल्या लोकांपुढे आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हे ठीक आहे. पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे जाऊन बसलेत, त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला व स्वाभिमानाला धक्का लावणारे आहे असे आम्हाला वाटते. शरद पवार यांनी दिल्लीत एकनाथ शिंदेंचा नव्हे तर महाराष्ट्र तोडणाऱ्या अमित शहा यांचा सत्कार केला. ज्यांनी शिवसेना फोडली अशांना तुम्ही सन्मानित करता, यामुळे आम्हाला वेदना झाल्या. दिल्लीतील राजकारण वेगळे असेल, पण यामुळे आम्हाला वेदना झाल्या. दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल व भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन आहे. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. आम्हालाही राजकारण कळते. पण काल जे काही झाले ते पाहून आम्हाला नक्कीच वेदना झाल्या आहेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
राऊत यांच्या टीकेनंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या. यावर शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पवारांच्या कृतीचे समर्थन करत राऊतांचा समाचार घेतला. “संजय राऊत यांचे वैयक्तिक मत काहीही असू शकते, पण या सत्कारात काहीही गैर नाही. शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत त्यामुळे ते त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठिशी ते ठामपणे उभे आहेत. शरद पवारांच्या राजकारणावर बोलण्याची उंची फार कमी लोकांची आहे. शरद पवारांना किती राजकारण कळतं हे कुणी सांगण्याची आवश्यकता नाही. राऊत यांना इतके दुःख असेल तर त्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की उद्धव ठाकरे यांनीदेखील अजित पवार यांचा सत्कार केला होता. त्यावेळी आमच्या पक्षातील कोणीही त्यावर आक्षेप घेतला नाही. प्रत्येक वेळी राजकारण मध्ये आणले, तर नक्कीच अवघड होईल,” असे अमोल कोल्हे म्हणाले.
“शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेंचा सन्मान केला. आपल्या भाषणात शिंदेंचे कौतुक केले. ज्या व्यक्तीने ५६ वर्षे महाराष्ट्रासाठी योगदान दिले, त्या शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक करून त्यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे, यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे काही लोकांचा पोटशूळ उठला आहे. संजय राऊत साहित्य संमेलनाला दलाली म्हणत असतील तर हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे,” अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी राऊत यांच्यावर टीका केली.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र याप्रकरणी संजय राऊत यांच्या भूमिकेची पाठराखण केली आहे. “टिळक पुरस्कारासाठी नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. मणिपूरच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय लोक मोदींना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यात शरद पवारांची राष्ट्रवादीसुद्धा होती. पण त्याच पुरस्कार सोहळ्याला शरद पवारांची उपस्थिती होती. मुळात पुरस्कार देण्या-घेण्याचे गणित अत्यंत सोपे आहे. जे व्यवस्थेची भलावण करतात, त्यांना व्यवस्था पुरस्कृत करते. जे व्यवस्थेची चिरफाड करतात, त्यांना व्यवस्था बहिष्कृत ठरवते,” अशा शब्दांत पोस्ट करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राऊतांची बाजू घेतली.
“दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊतांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली. सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही. तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला. पण मागील दोन-तीन वर्षात भाजपने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता, यामुळेच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी भाजपवर याचे खापर फोडले.
वंदनीय शरद पवारांचा अवमान केला -शिंदे
संजय राऊत यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “टीका करणाऱ्यांचे संतुलन सध्या बिघडले असून त्यांना द्वेषाने पछाडलं आहे. आतापर्यंत शरद पवार साहेब त्यांना वंदनीय होते, पण पवार साहेबांनी माझा सत्कार केल्यानंतर त्यांनी पवारांचाही अपमान केला. टीका करणाऱ्यांना जनतेने विधानसभेत त्यांची जागा दाखवली, त्यांना चारीमुंड्या चित केले. तरीही त्यांनी महापराक्रमी महादजी शिंदें यांच्यासह साहित्यिकांना दलाल म्हणत त्यांचा अपमान केला. परंतु आम्ही आरोपाला आरोपांनी उत्तर देणार नाही, तर कामातून उत्तर देणार.”