अहमदनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना नगरमधून प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पाठवलेले प्रसादाचे लाडू मिळाले आहेत. भाजपचे नगर शहर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव यांनी हे लाडू पाठवले होते. हे प्रसादाचे लाडू मिळताच राऊत यांनी देखील जाधव यांना पत्र पाठवले. खासदार राऊत यांचे भाजपचे धनंजय जाधव यांना आलेल्या या पत्राची चर्चा चांगलीच सुरू आहे.
अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्यानिमित्ताने खासदार सुजय विखे यांनी विखे कुटुंबीयांकडून नगर जिल्ह्यात साखर आणि डाळ वाटप सुरू केले होते. तब्बल साडेसहा लाख शिधापत्रिका धारकांना ही साखर आणि डाळ वाटून प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी प्रसाद म्हणून लाडू तयार करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद म्हणून नगर जिल्ह्यात प्रसादाचे २१ लाख लाडू तयार झाल्याचा दावा खा. विखे यांनी केला आहे. दरम्यान, खासदार विखे यांनी अयोध्येत जात प्रभू श्रीराम मूर्तीला नगर जिल्ह्यात बनवलेले प्रसादाचे लाडू अर्पण केले.
खा. विखे यांच्या साखर आणि डाळ वाटपावर नगर दौऱ्यावर असताना खा. संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. "खासदार विखे हे साखर आणि डाळ वाटून लोकांकडे मते मागत आहेत आणि लोक त्यांना मत देत आहेत. नगर जिल्ह्यातील राजकारण दोन-चार लोकांच्या हातात असून, बाकी सगळे गुलाम आणि लढत राहायचे, घोषणा देत राहायचे. हे कुठेतरी हे थांबवल पाहिजे", अशी टीका खासदार राऊत यांनी केली होती.
खासदार राऊत यांच्या या टीकेला भाजपचे नगर शहर जिल्हा उपाध्यक्ष व मा. नगरसेवक धनंजय जाधव यांनी साखर आणि डाळ वाटपातून नगरकरांनी तयार केलेले प्रसादाचे लाडू पाठवून अनोख्यापद्धतीने उत्तर दिले होते. या लाडूंबरोबर पत्र पाठवत खासदार राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना केल्याचे म्हटले होते. खासदार राऊत यांना धनंजय जाधव यांचे पत्र मिळाले आहे. त्यानंतर आता धनंजय जाधवांनाही खासदार राऊतांचे पत्र आले आहे.
पत्रात नेमकं काय म्हणाले...
आपण आगत्यपूर्वक पाठवलेला प्रसादाचा लाडू मिळाला. मी आपला आभारी आहे. प्रभू श्रीराम हे एकवचनी व सत्य वचनी होते. त्यांचा वारसा पुढे नेणे हाही एक प्रसादच आहे. सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी हा श्रीरामाचा आदर्श पाळावा. व देशात रामराज्य निर्माण करावे, अशा माझ्या शुभेच्छा… या आशयाचे पत्र खा. राऊत यांनी जाधव यांना पाठवले आहे.