पुणे : संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पालखीचे शनिवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. पालखी जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने भक्ती शक्ती चौक येथून शहरात दाखल झाली.
टाळ मृदंगाच्या गजरात पालखीने शहरात प्रवेश केला. पालखीसोबत हजारो वारकरी पायी पंढरपूरला निघाले आहेत. शनिवारचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात होणार आहे. भक्ती शक्ती चौक मार्गे पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाली.
भक्ती शक्ती चौकात पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच विविध राजकीय पक्षांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आले. पालिकेच्या वतीने दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. कंपन्या आणि सामाजिक संस्थांच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेत अन्नाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
पालखी सोहळ्यात विविध संस्थांच्या वतीने साहित्य, पर्यावरण आदी विषयांवर उपक्रम राबविण्यात आले. विठू नामाच्या जयघोषात ही पालखी पुढे निघाली आहे.