बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या रिमांडवर बुधवारी केज न्यायालयाऐवजी बीड जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांकडून नवनवीन दावे आणि माहिती कोर्टात सादर करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला ७ दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली. ‘एसआयटी’ने कराडला १० दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.यावेळी ‘एसआयटी’ने न्यायालयासमोर अनेक बाबींचे खुलासे केले आहेत. ‘एसआयटी’ने ९ बाबी कोर्टासमोर मांडल्या होत्या. आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचे अपहरण केले होते, तसेच हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती, असे ‘एसआयटी’ने न्यायालयात सांगितले.
संतोष देशमुख यांच्या अपहरणाआधी तिन्ही आरोपींमध्ये दूरध्वनीवरून १० मिनिटे चर्चा झाली होती. संघटित गुन्हेगारीचे हे प्रकरण आहे. त्यामुळे आरोपीवर मकोका लावला आहे. तसेच कराडने केलेल्या गुन्ह्यांची यादी ‘एसआयटी’ने न्यायालयात सादर केली. या प्रकरणातील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे ‘एसआयटी’ने सांगितले.
अटक बेकायदेशीर असल्याचा कराडच्या वकिलांचा दावा
कराडला न्यायालयात नेत असताना पोलिसांच्या ताफ्यात अन्य चार वाहने शिरली होती. याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे. तसेच कराडच्या विदेशी मालमत्तेविषयी तपास सुरू आहे. दुसरीकडे कोणत्याही आरोपीने वाल्मिक कराडचे नाव घेतले नाही. वाल्मिक कराडविरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही, असा युक्तीवाद कराडच्या वकिलांनी केला. वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे वकिलांनी सांगितले.
कराडला बुधवारी ‘एसआयटी’ने बीड येथील न्यायालयात हजर केले. त्यावेळी तपास अधिकाऱ्यांनी कराड याच्यावरील गुन्ह्यांची यादी न्यायालयाकडे दिली. कराडवर ‘मकोका’ का लावण्यात आला याच्यासाठी ही यादी देण्यात आली. विशेष न्यायालयात ही सुनावणी इन कॅमेरा झाली. त्यामध्ये ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात दुपारी ३.२० ते ३.३० वाजता संभाषण झाले होते. त्याचवेळी संतोष देशमुख यांचे अपहरण झाले होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मृतदेह सापडला होता, असे अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.
कराड समर्थकांची निदर्शने
कराड याच्याविरुद्ध खोटे गुन्हे नोंदविण्यात आल्याचा दावा करून त्याच्या समर्थकांनी बुधवारी दुसऱ्या दिवशीही निदर्शने केली. परळी शहराजवळील एका गावात कराड समर्थक भ्रमणध्वनी मनोऱ्यावर आणि पाण्याच्या टाकीवर चढले. परळीतील पांगरी परिसरातील मनोऱ्यावर आणि पाण्याच्या टाकीवर कराडचे पाच समर्थक चढले. तर महिलांच्या एका गटाने गावातच ठिय्या आंदोलन पुकारले. कराडच्या समर्थकांनी परळी बंद पुकारला होता, त्यादरम्यान ८० टक्के दुकाने बंद होती. निदर्शकांच्या एका गटाने वडगाव येथे जमून पोलीस उपअधीक्षकांना एक निवेदन दिले. राज्य राखीव पोलीस दल आणि दंगल नियंत्रण पोलिसांची एक कंपनी अशी अतिरिक्त कुमक बीडमध्ये मागविण्यात आली होती.
सरकारने कराडला अंगरक्षक दिलाच कसा - दमानिया
वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे असताना शासकीय अंगरक्षक दिलाच कसा, कोणामुळे दिला गेला अंगरक्षक, अशा माणसांची सुरक्षा आमच्या कराच्या पैशातून होणार, याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कोणी केले, धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने ना, मग त्यांचा राजीनामा कधी घेणार, असे अनेक सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केले आहेत.
जरांगेंचा मुंडेंवर हल्ला
या घटनेतील एकही आरोपी सुटता कामा नये. धनंजय मुंडेंची गुंडाची टोळी संपली पाहिजे. ही टोळी दहशत निर्माण करणारी आहे. देशमुख कुटुंबीयांना भेटण्याची धनंजय मुंडेंची मानसिकता नाही. हा क्रूर आहे. खून करणाऱ्यापेक्षा त्याचा कट रचून गुन्हा घडवून आणणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. आरोपींना साथ देणारा सरकारमधीलच मंत्री आहे तोही गुन्हेगार आहे, असे सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर हल्ला चढविला.
बीड, परभणी घटनांची न्यायालयीन चौकशी
मुंबई : भाजप नेतृत्वाखालील महायुती सरकारने बीड आणि परभणीतील घटनांप्रकरणी दोन स्वतंत्र न्यायालयीन चौकशी समित्यांची स्थापना केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम.एल. ताहलियानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, परभणी हिंसाचार प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्ती अचलियांकडे सोपवण्यात आली आहे. परभणीमध्ये भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या विधी शाखेतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने मोठे आंदोलन झाले होते.