सातारा जिल्हा बँकेच्या नऊ जागा बिनविरोध; दहा वर्षांच्या संचालकपदाचा दिग्गजांना फटका, निवडणुकीत मोठी माघार 
महाराष्ट्र

सातारा जिल्हा बँकेच्या नऊ जागा बिनविरोध; दहा वर्षांच्या संचालकपदाचा दिग्गजांना फटका, निवडणुकीत मोठी माघार

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या.

रामभाऊ जगताप

कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. सलग दहा वर्षे संचालकपदावर राहिलेल्या व्यक्तींच्या पात्रतेबाबत न्यायालयीन निर्णय आणि रिझर्व्ह बँकेच्या निकषांमुळे अनेक दिग्गजांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यसभेचे खासदार नितीन पाटील आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा समावेश आहे. माघारीनंतर २१ पैकी नऊ जागांवर बिनविरोध निवड झाली असून, उर्वरित जागांसाठी लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.

माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, भाजपचे आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम, स्मिता देशमुख, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे, सुरभी भोसले, इंदिरा घार्गे आणि नितीन भरगुडे-पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांनीही माघार घेतली. या घडामोडींमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नऊ जागांवर बिनविरोध निवड झाली. यामध्ये खटाव सोसायटी मतदारसंघातून नंदकुमार मोरे, कृषी प्रक्रिया उद्योग मतदारसंघातून डॉ. अतुल भोसले, सातारा सोसायटी मतदारसंघातून सर्जेराव सावंत, वाई सोसायटी मतदारसंघातून सत्यजित वीर, खरेदी-विक्री संघ मतदारसंघातून मकरंद पाटील, बँका व पतसंस्था मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर, गृहनिर्माण व दूध संस्था मतदारसंघातून काका धुमाळ, तर महिला राखीव मतदारसंघातून ऋतुजा पाटील आणि मंगल पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या पार्श्वभूमीवर दिग्गज नेत्यांनी माघार घेतल्याने जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात बदल होण्याची शक्यता आहे. आता उर्वरित मतदारसंघांतील लढती आणि मतदारांचा कौल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

माणमध्ये तिरंगी, पाटणमध्ये पारंपरिक लढत

माण सोसायटी मतदारसंघात भाजपचे मंत्री जयकुमार गोरे, त्यांचे बंधू शिवसेनेचे शेखर गोरे आणि मनोज पोळ यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. पाटण मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात सामना रंगणार आहे. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माघारीमुळे कराड सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीचे चित्रही बदलले आहे.

‘अर्ज मागे घेतला नसता तर न्यायालयात गेलो असतो’

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जावळी सोसायटी आणि कृषी प्रक्रिया मतदारसंघांतून अर्ज दाखल केले होते. माघारीच्या वेळी त्यांची खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी भेट झाली. त्या वेळी, “तुम्ही अर्ज मागे घेतला नसता, तर मी स्वतः न्यायालयात जाणार होतो,” असे शिंदे यांनी उदयनराजेंना सांगितल्याची चर्चा आहे. या संवादामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

न्यायालयीन निर्णयामुळे पात्रतेचा मुद्दा ऐरणीवर

सहकारी बँकांमध्ये सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तींच्या पात्रतेचा मुद्दा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला. या संदर्भातील न्यायालयीन निर्णयांमुळे अनेक इच्छुकांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. काही उमेदवारांच्या अर्जांना आव्हान देण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने संबंधित प्रकरणांत दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले; मात्र तेथेही दिलासा मिळाला नसल्याचे वृत्त आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळीनंतर कसारा मार्गावर १५ डब्यांच्या लोकल वाढणार

MLC Election 2026 : शिक्षक, ‘पदवीधर’साठी आज मतदान; मतदानासाठी यंत्रणा सज्ज; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात

CJP चे आज देशव्यापी आंदोलन; दीपके, राकेश टिकैतसह परकला सीतारामन, प्रकाश राज यांची उपस्थिती

मतवारी दुष्काळाची! छतावरचं पाणी, घरासमोरची टाकी; ब्राझीलची दहा लाख टाक्यांची चळवळ

नांदेड : दसरा गेला अंधारात, आता दिवाळीचं काय? फुले अक्षरशः फेकली रस्त्यावर; शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघाला नाही