तारळी प्रकल्पाला दणका; सावरघर येथील उत्खनन थांबविण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश 
महाराष्ट्र

तारळी प्रकल्पाला दणका; सावरघर येथील उत्खनन थांबविण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश

पाटण तालुक्यातील तारळी येथील प्रस्तावित पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पाशी संबंधित सावरघर गावातील गट क्रमांक ३३ व ३४मधील उत्खनन आणि बांधकामाच्या कामावर गंभीर आक्षेप घेत कंपनीला उत्खनन व बांधकाम तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

रामभाऊ जगताप

कराड : पाटण तालुक्यातील तारळी येथील प्रस्तावित पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पाशी संबंधित सावरघर गावातील गट क्रमांक ३३ व ३४मधील उत्खनन आणि बांधकामाच्या कामावर गंभीर आक्षेप घेत कंपनीला उत्खनन व बांधकाम तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मंडळाची पूर्वपरवानगी मिळाल्याशिवाय कोणतेही काम पुन्हा सुरू करू नये, असेही बजावले आहे.

तारळी परिसरात १५०० मेगावॉट क्षमतेचा पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी परिसरातील निवडे, तोंडोशी, कळंबे, जळव यांसह अन्य गावांतील खासगी जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया आणि प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध कामे प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाला स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत असतानाच आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही संबंधित कामकाजाबाबत आक्षेप घेतला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कंपनीला काही अटी व शर्तीच्या अधीन राहून जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम १९७४च्या कलम २६ आणि वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम १९८१च्या कलम २१ अन्वये संचालनासाठी संमती दिली होती. तसेच घातक व इतर टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन व आंतरसीमा वहन नियम २०१६च्या नियम ६ अन्वये प्राधिकारही प्रदान केला होता. मात्र, संमती देताना निश्चित केलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे, प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक आणि कार्यक्षम उपकरणे उपलब्ध करणे तसेच जल व वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना करणे कंपनीवर बंधनकारक होते.

दरम्यान, सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली असून या पाहणीदरम्यान सावरघर गावातील गट क्रमांक ३३ व ३४ येथे तात्पुरत्या कामगार शिबिरासाठी तसेच इतर साहित्याच्या साठवणुकीसाठी उत्खनन आणि विकासकामे सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, या कामांसाठी मंडळाला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसून मंडळाची आवश्यक संमती व परवानग्याही घेतल्या नसल्याचे अधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटले आहे. याशिवाय, सावरघर येथील संबंधित गट क्रमांकांमध्ये सुरू असलेल्या उत्खनन व विकासकामांसाठी सक्षम प्राधिकरणाकडून आवश्यक पर्यावरणविषयक मंजुरी घेतली नसल्याचाही आक्षेप मंडळाने घेतला आहे.

या प्रकरणी सातारा येथील उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी पाहणी अहवालाच्या आधारे कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. मंडळाने संबंधित प्रकरणाची कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांचे अहवाल तपासल्यानंतर जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायद्यांमधील तरतुदींचे पालन न करता उत्खनन व बांधकाम केल्याचे तसेच पुरेशा प्रदूषण नियंत्रण उपाययोजना न केल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे जल व वायू प्रदूषण होण्याची शक्यता आणि पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

तारळी पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पावरून गेल्या काही दिवसांपासून पाटण तालुक्यात पर्यावरणविषयक चर्चा आणि विरोध वाढत आहे. प्रकल्पामुळे पश्चिम घाटातील पर्यावरण, जंगलसंपदा, नैसर्गिक जलस्रोत आणि स्थानिक गावांच्या भवितव्यावर काय परिणाम होणार, असे प्रश्न पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, मंडळाच्या या निर्देशांनंतर कंपनी कोणती भूमिका घेतते, आवश्यक परवानग्यांची पूर्तता कशी केली जाते आणि संबंधित कामांना पुन्हा परवानगी मिळते का, याकडे आता पाटण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

...तर कारवाईचा बडगा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला सावरघर येथील गट क्रमांक ३३ व ३४ मधील सुरू असलेली तसेच प्रस्तावित उत्खनन व बांधकामाची कामे तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. मंडळाची पूर्वपरवानगी मिळाल्याशिवाय कोणतेही काम पुन्हा सुरू करू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्देशांचे पालन न केल्यास जल व वायुप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : शासकीय कर्मचाऱ्यांना घरदिलासा; वांद्रे, पवई, घाटकोपरला ५०० नवी सेवा निवासस्थाने

Mumbai : १० महिन्यांत ७ खून, उपनगरीय लोकलमध्ये हत्यासत्र; पश्चिम रेल्वेवर ५, तर मध्य रेल्वेवर २ घटना

Mumbai : पवई तलावावर देशातील सर्वांत भव्य म्युझिकल फाऊंटन; ३० कोटींच्या प्रकल्पाचे आज उद्घाटन, शिवरायांची शौर्यगाथा साकारणार

मेट्रो स्थानकांच्या नामकरणासाठी समिती; मुख्यमंत्री फडणवीस अध्यक्ष, एकनाथ शिंदे सहअध्यक्ष

आजचे राशिभविष्य, २२ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत