महाराष्ट्र

"माझं-तुमचं वैर नाही; असलं तरी फरक पडत नाही...नाशिक कुंभसाठीच्या वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंनी गिरीश महाजनांना सुनावलं

“साधू आले-गेले तरी काही फरक पडत नाही; झाडं गेली तर नाशिकचं नुकसान होईल," असे म्हणत तपोवनातील टेंडर प्रक्रियेवर सयाजी शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला.

किशोरी घायवट-उबाळे

नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. अशातच, तपोवन परिसरातील ‘साधूग्राम’ प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीवरून नवे वादळ उठले आहे. अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे थेट तपोवन येथे पोहोचले आणि या निर्णयाला तीव्र विरोध केला. “झाडं म्हणजे आपले आई-वडील” असे सांगत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत झाडांचे संरक्षण केले पाहिजे, असा ठाम आग्रह धरला. तसेच, "माझं-तुमचं काही वैर नाही; असलं तरी फरक पडत नाही" असं म्हणत झाडांच्या मुद्द्यावरून त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सुनावलं.

“झाडं आमचे आई-बाप, त्यांच्यावरचा हल्ला...

तपोवन परिसरात साधू-महंतांच्या निवासासाठी ११५० एकरांवर साधूग्राम उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी सुमारे १८०० झाडे तोडण्याची प्रक्रिया हाती घेण्याचा प्रस्ताव आहे. या वृक्षतोडीला स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी, राजकीय व्यक्ती आणि काही कलाकारांनी विरोध केला. या पार्श्वभूमीवर अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज (दि.२९) तपोवन परिसरात वृक्षांची पाहणी केली. त्यांनी “झाडं आमचे आई-बाप आहेत, त्यांच्यावरचा हल्ला सहन करणार नाही,” अशी भूमिका घेत "एकही झाड तोडू देणार नाही" असा इशारा दिला.

सेलिब्रिटी म्हणून नाही तर माणूस म्हणून आलोय...

ते म्हणाले, “या जगात झाडं हेच सर्वात मोठे सेलिब्रिटी आहेत. आम्ही इतर कुठल्याही सेलिब्रिटीला मानत नाही. जो जगवतो तोच खरा सेलिब्रिटी. जो सावली देतो, ऑक्सिजन देतो, फळं-फुलं देतो.” मी येथे कोणताही सेलिब्रिटी म्हणून आलो नाही; एक माणूस म्हणून, नाशिककरांच्या आणि आंदोलकांच्या बाजूने उभा राहायला आलो आहे.”

माझं-तुमचं काही वैर नाही; असलं तरी....

सयाजी शिंदे सरकारवर टीका करताना म्हणाले, "तपोवनसाठी काढलेले टेंडर चुकीचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत." पुढे ते म्हणाले, “सरकार येथे प्रदर्शन केंद्र उभारणार असल्याची माहिती मिळाली. याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर देणे आवश्यक आहे. तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात. माझं-तुमचं काही वैर नाही; असलं तरी फरक पडत नाही, कारण प्रश्न झाडांचा आहे. इथली झाडं तोडू आणि दुसरीकडे नवी लावू अशी वक्तव्यं करू नका.” असं म्हणत सयाजी शिंदे यांनी गिरीश महाजन यांना सुनावलं.

"साधू आले-गेले तरी...

सयाजी शिंदे म्हणाले, “साधू आले-गेले तरी काही फरक पडत नाही; झाडं गेली तर नाशिकचं नुकसान होईल." तपोवनातील टेंडर प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाशिकमधील आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच आहे, आणि आता सयाजी शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला आणखी बळ मिळाले आहे.

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...