ANI
महाराष्ट्र

मुख्यमंत्री काँग्रेसचाच! बाळासाहेब थोरात यांचा दावा

Swapnil S

मुंबई : एकीकडे काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी पुढचा मुख्यमंत्री ही महिला असेल, असे वक्तव्य केले असतानाच, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असेल, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे.

काही आठवड्यांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा, मी तुम्हाला पाठिंबा देतो,’ असे आवाहन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या महाविकास आघाडीमधील दोन प्रमुख घटक पक्षांना केले होते. मात्र, आधी सत्तेत असलेले महायुतीचे सरकार उधळवून लावू आणि नंतरच संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरवू, अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली होती.

ही चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी महिला मुख्यमंत्र्याची चर्चा सुरू केली होती. त्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेच्या रश्मी ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली होती. त्यानंतर एका दिवसातच, काँग्रेसच्या आढावा बैठकीत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार, असा दावा केला आहे.

“येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून चांगले काम करण्याचे आवाहन मी कार्यकर्त्यांना करतो. मला १०० टक्के खात्री आहे की, महाविकास आघाडीचा आणि तोसुद्धा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. याची खात्री आहे,” असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची कोकण विभागामध्ये जिल्हानिहाय आढावा बैठक भाईंदर येथे पार पडली. त्यावेळी थोरात यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस उत्सुक असल्याचे जाहीर करून महाविकास आघाडीमध्येच नव्या वादाला फोडणी दिली आहे.

मुंबईतील जागावाटपावरून ‘मविआ’त रस्सीखेच

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी गुरुवारी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक ‘मातोश्री’वर पार पडली. मात्र, या बैठकीत जागावाटपाबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. ‘मविआ’तील वरिष्ठ नेते जागावाटपाचा निर्णय घेतील, असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील ३६ मतदारसंघांपैकी २० ते २५ जागा लढवण्यासाठी ठाकरे गट आग्रही आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला १६ ते १८ जागा हव्या आहेत. तसेच शरद पवार गटाने मुस्लिमबहुल भागात ७ उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे ‘मविआ’त मुंबईतील जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

महायुतीला सत्तेचा अहंकार

  • थोरात म्हणाले की, “महायुती सरकारला सत्तेचा अहंकार झाला आहे. सर्वसामान्य जनतेला चिरडून टाकणारे सत्ताधारी पक्षातील नेत्यांचेच नातेवाईक आहेत. महायुतीचे सरकार भ्रष्ट मार्गाने आलेले आहे, आजही वाड्या-वस्त्यांवर ‘५० खोके, एकदम ओके’ हे विसरले गेले नाही.

  • भ्रष्ट महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यालाच चार दिवसांनी सरकारमध्ये घेतले व तिजोरीच्या चाव्या दिल्या. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणणाऱ्यांनीच भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेत घेतले. भ्रष्टाचारावर बोलण्याचा भाजपला अधिकार नाही.”

  • विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्या निवडणुकाही महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी आतापासूनच काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होऊन ‘मविआ’चाच मुख्यमंत्री होईल, असा दावाही त्यांनी केला.

‘मेट्रो-३’ला नवा मुहूर्त! पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सेवेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार

मध्य रेल्वेत ज्येष्ठांसाठी मालडबा खुला करा; हायकोर्टाचे रेल्वे प्रशासनाला आदेश

मराठा आरक्षणाचा वाद; राज्य सरकारला ‘तो’ अधिकार नाही - हाके

ठाणे स्थानकात उद्या रात्री ६ तासांचा पॉवर ब्लॉक, रात्री १०.३० ते पहाटे ४.३० पर्यंत गर्डर बसविण्याचे काम

धुळ्यातील धक्कादायक घटना, एकाच कुटुंबातील चौघांनी संपवले आयुष्य