महाराष्ट्र

दूध भेसळखोरांविरोधात कायदा करणार! केंद्राकडे राज्य सरकारची शिफारस; मुख्यमंत्र्यांचे कारवाई करण्याचे निर्देश

दुधात भेसळ करून लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : दुधात भेसळ करून लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर, असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी व्ही. रमणी पॅटर्न राबविणे तसेच राज्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविषयी आयोजित संयुक्त बैठकीत शिंदे बोलत होते.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम, माजी आमदार सुरेश धस यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. चहल, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, तसेच केंद्रीय एफएसएसएआयचे अधिकारी आदी उपस्थित होते.

उत्पादक शेतकऱ्यांना फटका

दुधातील भेसळीचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी दुष्परिणाम देखील होतात. हे अत्यंत चिंताजनक असून, याला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. तातडीची उपाययोजना करत दोन्ही विभागांनी संयुक्त मोहीम हाती घ्यावी. दुधातील भेसळीविरोधात राज्याचा स्वतंत्र कायदा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम

अन्न पदार्थातील भेसळ ही गंभीर बाब आहे. यामुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यवर गंभीर दुष्परिणाम होतो. आपल्या भावी पिढीचेही नुकसान होणार आहे. कर्करोगांसारखा दुर्धर आजारही अनेकांना जडतो. त्यामुळे भेसळखोरांवर एमपीडीएपेक्षांही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्न पदार्थातील भेसळ व दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात केंद्र व राज्य शासनाच्या दोन्ही यंत्रणांनी प्रभावीपणे कारवाईसाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी दोन्ही विभागांना सहकार्य केले जाईल. अद्ययावत प्रयोगशाळा, उपकरणे, मोबाईल प्रयोगशाळा यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल.

दोन मिनिटांत गाड्या फुल्ल! गणपतीसाठी कोकण रेल्वेची तिकिटे 'रिग्रेट'; भाविक चिंतेत, अतिरिक्त गाड्यांची मागणी

व्यापारी जहाजावर हल्ला; ओमानजवळ १० भारतीय बचावले, १ बेपत्ता; भारताकडून तीव्र निषेध

Mumbai : 'बेस्ट'ला उतरती कळा; प्रवाशांची संख्या, उत्पन्नात १० वर्षांत झाली घट; बसेसचा ताफाही ४ हजारांवरून २७८७ वर

व्हिएतनाम बोट दुर्घटनेप्रकरणी कॅप्टनला अटक

देवकुंड धबधब्यात दोन जण बुडाले; पुण्याहून रायगड फिरण्यासाठी आले होते १७ पर्यटक, बचाव कार्य सुरू