महाराष्ट्र

आणखी चार आमदार शिंदेना मिळण्याची शक्यता

शिंदेसोबत गेलेले दोन आमदार नितीन देशमुख व कैलास पाटील हे पुन्हा शिवसेनेत परतले आहेत

प्रतिनिधी

शिंदे हे ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत आहेत. गुवाहाटीत सध्या शिवसेनेचे ३३ आमदार असून २ अपक्ष आहेत. शिवसेनेचे आमदार संजय राठोड तेथे पोहोचले आहेत. याशिवाय आणखी चार आमदार योगेश कदम, मंजुळा गावित आणि गोपाळ दळवी, चंद्रकांत पाटील सुरत विमानतळावरून गुवाहाटीला रवाना झाले आहेत. म्हणजेच शिंदेसोबत असलेल्या आमदारांची संख्या ४० झाली आहे. दरम्यान, गुलाबराव पाटील हेही रात्री गुवाहाटीत दाखल झाले असून आणखी चार आमदार शिंदेना मिळण्याची शक्यता आहे.

दोन आमदार शिवसेनेत परतले

शिंदेसोबत गेलेले दोन आमदार नितीन देशमुख व कैलास पाटील हे पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. त्यांनी आपल्याला जबरदस्तीने सुरतला नेण्यात आल्याचे सांगितले. नितीन देशमुख यांनी सुरतहून परतल्यानंतर तेथील पोलीस आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्याला बळजबरीने रुग्णालयात नेऊन इंजेक्शन दिल्याचा आरोप केला. या बंडाचे षडयंत्र हे शिंदे यांचे नसून भाजपचे असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपने आमदारांवर ईडीकडून दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

मंत्रिमंडळ बैठकीला मंत्र्यांची दांडी

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. कोरोना झाल्याने ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत आठ मंत्री गायब होते. यापैकी काही मंत्री शिंदे यांच्यासोबत असल्याचे समजते.

हॉटेलवर सीआरपीएफचा पहारा

आसामची राजधानी गुवाहाटी हे महाराष्ट्र सरकारच्या राजकारणातील वादळाचे केंद्र बनले आहे. सर्व बंडखोर आमदार हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामास आहेत. हॉटेलच्या बाहेर आणि आत आसाम पोलीस आणि सीआरपीएफचे जवान तैनात आहेत. इथे काही अडचण आल्यास प्लॅन-बी अंतर्गत सर्व आमदारांना गुवाहाटीहून इम्फाळला नेले जाईल, अशी तयारीही भाजपने केली आहे.

Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

कचऱ्यासाठी विशेष मोहीम; BMC चा सोमवारपासून उपक्रम; पंधरवड्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावणार

शहाड उड्डाणपूल १८ दिवसांसाठी बंद; १५ ऑक्टोबरपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर अनिवार्य

CSMT स्थानकातील प्लॅटफॉर्म १८ राहणार बंद; पुनर्विकासासाठी ८० दिवस फलाट बंद; दोन एक्स्प्रेस दादरपर्यंतच चालणार