एकनाथ शिंदे  संग्रहित फोटो
महाराष्ट्र

शिंदे सेना १२६ जागांसाठी आग्रही; विधानसभा क्षेत्रात निरीक्षकांची नियुक्ती

महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आगामी विधानसभा निवडणुकीत १२६ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे/मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून रणनीती आखली जात आहे. महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आगामी विधानसभा निवडणुकीत १२६ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी १२६ विधानसभा क्षेत्रात १२६ निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जागेची अदलाबदल झाल्यास उमेदवारांनी मनाची तयारी ठेवावी, असा सल्लाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या आमदार, पदाधिकाऱ्यांना दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर गुरुवारी बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

लोकसभा निवडणुकीत मविआला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे, तर महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने त्यांनी सावध भूमिका घेत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. ‘वर्षा’ बंगल्यावर शिंदे गटाच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत गाफिल न राहता विधानसभा मतदारसंघ बांधणीवर भर देण्यात आला आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२६ जागा लढवण्याचा प्लॅन तयार केला आहे. यासाठी १२६ विधानसभा निरीक्षक नेमले जाणार असून, प्रभारीही नेमले जाणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या सरकारी योजना सर्व मतदारसंघात पोहोचवा, सदस्य नोंदणीवर भर द्या, असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली असून महिलांचे प्रश्न जाणून घेत ते तातडीने सोडवण्यासाठी शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करावी, प्रत्येकाने आपल्या मतदारसंघावर लक्ष द्यावे, महायुतीत बेबनाव होणार नाही याची काळजी सर्व आमदारांनी घ्यावी, असे निर्देश शिंदे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले.

जागावाटपाचा निर्णय महायुतीचे नेते घेणार

विधानसभा निवडणुकीत कुणी किती जागा लढवाव्यात, याबाबतचा निर्णय महायुतीचे नेते घेतील, असे शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले.

महायुतीत घमासान

विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १०० हून अधिक जागा लढवण्याची तयारी केली आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही ८५ ते १०० जागांवर दावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीतील ‘मोठा भाऊ’ म्हणवून घेणारा भाजप नेमक्या किती जागा लढविणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी