Facebook
महाराष्ट्र

शिवसेनेचे परब, अभ्यंकर, भाजपचे डावखरे विजयी

Swapnil S

मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे (उबाठा) अनिल परब, ज. मो. अभ्यंकर, तर भाजपचे निरंजन डावखरे विजयी झाले.

मुंबईतील पदवीधर व शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ आदी चार मतदारसंघांत ही निवडणूक झाली होती.

मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आणि भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्यात थेट लढत होती. परब हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत, तर दुसरीकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर ​​​​​​ यांचा विजय झाला आहे. तसेच कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपला गड कायम राखला आहे. डावखरे यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले.

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी नेरूळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे पार पडली. या निवडणुकीत ६७६४४ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ६४२२२ मते वैध ठरली, तर ३४२२ मते अवैध ठरली. जिंकण्यासाठी ३२११२ मतांचा निश्चित कोटा ठेवला होता. अनिल विजया दत्तात्रय परब (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) हे ४४,७८४ मतांनी विजयी झाले. किरण रवींद्र शेलार, (भाजप) यांना १८७७२ मते मिळाली. पहिल्या पसंतीची ४४,७८४ मते मिळवून ॲॅड. अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

अनिल परब म्हणाले की, हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करतो. बाळासाहेबांचे आशीर्वाद असेच कायम राहू दे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी आभारी आहे. माझ्या विजयासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष लढले, त्यांचा आभारी आहे. मुंबई फक्त शिवसेनेचीच आहे. मुंबईचा मतदार हा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मागे उभा आहे, असे ते म्हणाले.

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपला गड कायम राखल्याचे सांगितले जात आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?