मुंबई : आगामी मुंबई महापालिका, महानगरपालिका, नगर पालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा भगवा फडकवण्यासाठी पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सोलापूर महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते जाणून घ्या, असे आवाहन सोलापूर शहर व मध्य उत्तर दक्षिणचे शिवसेना ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने नाकारले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये काय झाले ते विसरून पुढील होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांना खंबीरपणे सामोरे जायचे आहे. त्यासाठी लागणारी पुरेशी यंत्रणा ही आपल्या स्तरावर तयार करून या निवडणुकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांनी मान्य करून एकजुटीने, ताकतीने जुने व नवीन असा मेळ घालून ही निवडणूक जिंकायची असे उद्गार कोकीळ यांनी यावेळी काढले.
मागील निवडणुकीत २२ नगरसेवक निवडून आणले होते. आगामी निवडणुकीत त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी मतभेद विसरून कामाला लागावे. या निवडणुकीत कोणाशी युती होईल वा महाविकास आघाडी होईल किंवा काय होईल ते नंतर पाहू पण सर्वांनी प्रत्येक प्रभागात आपली बूथ यंत्रणा व सक्षम उमेदवारांनी तयारीला लागावे, असे अहवाल अनिल कोकीळ यांनी केले.
यावेळी उपनेते अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख प्रा. दासरी यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत काही जणांचा पक्षप्रवेश झाला. शिवसेना ठाकरे गट सोलापूर शहराच्या वतीने पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.