Nashik : सिंहस्थ कुंभपर्वाला शानदार प्रारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण, २१ महिने चालणार सिंहस्थ कुंभमेळा (Photo-X)
महाराष्ट्र

Nashik : सिंहस्थ कुंभपर्वाला शानदार प्रारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण, २१ महिने चालणार सिंहस्थ कुंभमेळा

गोदावरीचा पावन तीर... वैदिक मंत्रांचा मंगलघोष शंखनादाने दुमदुमलेला आसमंत... भगव्या धर्मध्वजेच्या स्वागतासाठी एकवटलेला संतसमुदाय अन् श्रद्धेच्या अपार भावनेने भारावलेले वातावरण! जणू हजारो वर्षांच्या भारतीय आध्यात्मिक परंपरेने शनिवारी नाशिक येथील रामतीर्थावर पुन्हा एकदा सजीव रूप धारण केले.

मिलिंद सजगुरे

मिलिंद सजगुरे

नाशिक : गोदावरीचा पावन तीर... वैदिक मंत्रांचा मंगलघोष शंखनादाने दुमदुमलेला आसमंत... भगव्या धर्मध्वजेच्या स्वागतासाठी एकवटलेला संतसमुदाय अन् श्रद्धेच्या अपार भावनेने भारावलेले वातावरण ! जणू हजारो वर्षांच्या भारतीय आध्यात्मिक परंपरेने शनिवारी नाशिक येथील रामतीर्थावर पुन्हा एकदा सजीव रूप धारण केले. गोदामाईच्या साक्षीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भगवी धर्मध्वजा आकाशात फडकली आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या मंगलमय प्रारंभाचा ऐतिहासिक शंखनाद झाला.

वैदिक ऋचांच्या पवित्र स्वरांत, साधू-संतांच्या सान्निध्यात आणि गोदावरीच्या अखंड प्रवाहाच्या साक्षीने साकारलेल्या या अलौकिक क्षणाने अवघी नाशिकनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येणाऱ्या श्रद्धेच्या महापर्वाची चाहूल देणारा हा सोहळा नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक अविस्मरणीय सुवर्णक्षण ठरला.

या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, महापौर हिमगौरी आडके आहेर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, खासदार डॉ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.

असा आहे सिंहस्थ कुंभ धर्मध्वज

सिंहस्थ धर्मध्वजावर श्री गंगा-गोदावरी धर्मध्वज शुभचिन्हे आणि त्यांचा अर्थ देण्यात आला आहे. त्यावरील अमृतकुंभ अमरत्व, मुक्ती आणि देवी शक्ती यांचे प्रतीक आहे. ओमकार सकारात्मकता, संपूर्ण विश्वाचे आणि सर्वव्यापकतेचे प्रतीक आहे. श्री हे अक्षर विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून देण्यात आले आहे. ध्वजावरील १२ रेशमी गोंडे सामाजिक एकतेचे आणि संघशक्तीचे, तर १ घंटा व ३ घुंगरू नादाचे आणि ब्रह्मनादाचे प्रतीक मानले आहे. ध्वजाच्या दुसऱ्या बाजूस गोदवारीचे वाहन असलेले मगर आणि सूर्य-चंद्राची - शुभचिन्हे अंकित करण्यात आली आहेत.

महाकुंभ प्राचीन परंपरेला आधुनिकतेशी जोडेल – मुर्मू

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभ भारताच्या प्राचीन सांस्कृतिक वारशाला आधुनिक आयामांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करेल. तसेच देशाची समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची उत्तम संधी या महाकुंभाच्या माध्यमातून उपलब्ध होईल, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी केले. शतकानुशतके सुरू असलेली कुंभमेळ्याची परंपरा ही भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकात्मतेचे तसेच सातत्याचे जिवंत उदाहरण असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; शृंगेरीपीठाचे जगद्‌गुरू शंकराचार्य यांची व संत महंतांची उपस्थिती

पवित्र कुशावर्त तीर्थ, गोदावरीच्या सान्निध्यात, मंत्रोच्चार, शंखनाद आणि साधू-महंतांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाचा मंगलमय सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणिशृंगेरीपीठाचे जगद्‌गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहण करून सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ झाला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळी कुशावर्त तीर्थ येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते उपस्थित साधू-महंतांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शृंगेरीपीठाचे जगद्‌गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांचेही स्वागत करण्यात आले.

सोहळ्याच्या प्रारंभी पवित्र गोदावरीचे विधिवत पूजन करण्यात आले. पुरोहितवृंदांनी मंत्रोच्चारांतून गोदावरीचे स्तवन केले. त्यानंतर संकल्पविधी करण्यात आला. सर्व प्राणिमात्रांना सुख, शांती, समृद्धी आणि कल्याण लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली. धर्मध्वज पूजनानंतर शंखनाद करून ध्वजाची आरती करण्यात आली. त्यानंतर जगद्‌गुरू शंकराचार्य आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मध्वजाची प्रदक्षिणा केली. यावेळी भगवान त्र्यंबकेश्वराची प्रार्थना करण्यात आली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आजचे राशिभविष्य, १ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

दिवाळीच्या फराळात गोड पदार्थ खाऊन कंटाळलात? ही तिखट शंकरपाळ्यांची रेसिपी एकदा पाहाच

Diwali 2026 : दिवाळीत घरीच बनवा मखाना-काजूची स्वादिष्ट बर्फी; पाहा सोपी रेसिपी

केस लांब वाढताच टोकांना फाटे फुटतात? 'या' ३ चुका टाळा, केस होतील मऊ अन् सिल्की!