राजन चव्हाण/ सिंधुदुर्ग
आंतरराष्ट्रीय स्तरावर समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापनासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘ब्लू फ्लॅग’ मानांकनाच्या यादीत रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील समुद्रकिनाऱ्यांचा समावेश झाला आहे. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे तसेच मेढा-निवती या किनाऱ्यांना अद्याप या मानांकनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनविकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रस्तावांचे पुढे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर, तर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांना २०२६-२७ या वर्षासाठी ब्लू फ्लॅग मानांकन मिळाले आहे. या मानांकनामुळे संबंधित जिल्ह्यांच्या पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्यास मदत होणार आहे. मात्र, निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे आणि पर्यटनाची मोठी क्षमता असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे किनारे या यादीत स्थान मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांनी या बाबतीत आघाडी घेतली असताना सिंधुदुर्गचे प्रस्ताव कोणत्या टप्प्यावर आहेत, याबाबत जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विभागाने स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज आहे. भोगवे आणि मेढा-निवतीसाठी आवश्यक निधी, पायाभूत सुविधा, जागेची उपलब्धता आणि पुढील पाठपुरावा याबाबत ठोस नियोजन झाले, तर या किनाऱ्यांनाही आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या दिशेने वाटचाल करता येईल.
भोगवेचा प्रस्ताव सहा वर्षांपासून रखडला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्रकिनाऱ्याची २ डिसेंबर २०१९ रोजी देशातील १३ प्रायोगिक समुद्रकिनाऱ्यांमध्ये निवड करण्यात आली होती. या यादीत महाराष्ट्रातील भोगवे हा एकमेव समुद्रकिनारा होता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, प्रायोगिक निवड होणे आणि प्रत्यक्ष ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळणे या दोन वेगळ्या प्रक्रिया असल्याने भोगवेचा प्रवास अद्याप पूर्ण झालेला नाही. या प्रक्रियेत समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्ता, वाहनतळ, आवश्यक पायाभूत सुविधा आणि त्यासाठी उपलब्ध होणारी जागा या अडचणी समोर आल्याचे सांगितले जाते. तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या प्रस्तावासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यानंतर या कामाला अपेक्षित गती मिळाली का? याबाबत स्पष्टता नाही.
प्रशासनाच्या पाठपुराव्याची गरज
ब्लू फ्लॅग मानांकनामुळे समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पर्यावरणाचे संरक्षण, पर्यटकांची सुरक्षितता आणि आवश्यक सुविधांच्या विकासाला चालना मिळते. तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात संबंधित किनाऱ्याची ओळख निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे सिंधुदुर्गच्या किनाऱ्यांना हे मानांकन मिळणे जिल्ह्याच्या पर्यटनविकासासाठी महत्त्वाचे ठरू शकते.
मेढा-निवतीच्या प्रस्तावाचेही भवितव्य अनिश्चित
एप्रिल २०२५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने संभाव्य सात समुद्रकिनाऱ्यांमध्ये मेढा-निवतीचा समावेश केला होता. मार्च-एप्रिल २०२५ दरम्यान या किनाऱ्यांची पाहणी करण्यात आली होती. राष्ट्रीय स्तरावरील ऑपरेटर डॉ. कुरुप यांनीही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. २८ एप्रिल २०२५ रोजी पुढील छाननीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यानंतर या प्रस्तावावर नेमकी कोणती कार्यवाही झाली, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.