राजन चव्हाण / कणकवली
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाला स्पष्ट दिशा देणारा निर्णय रविवारी जाहीर झाला. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती या निवडणुका एकत्रितपणे लढवणार असून, जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, उमेदवार निवडीचे सर्वाधिकार भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्याकडे देण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर राणेंची पकड अधिक मजबूत झाली आहे.
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी कणकवली येथील ‘ओम गणेश’ या आपल्या निवासस्थानी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ही अधिकृत घोषणा केली. तिन्ही घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित असलेल्या बैठकीत जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत होऊन शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
घोषित फॉर्म्युल्यानुसार, जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागांपैकी ३१ जागा भाजपला, तर १९ जागा शिवसेना (शिंदे गट) ला देण्यात आल्या आहेत. तर पंचायत समितीच्या १०० जागांपैकी ६३ जागा भाजपला आणि ३७ जागा शिवसेनेला सोडण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) इच्छुक असल्यास त्यांनाही भाजप व शिवसेनेकडून काही जागा देण्यात येतील, असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
जाहीर करण्यात आलेल्या फॉर्म्युल्यानुसार,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप जिल्हा परिषदच्या ११ व पंचायत समितीच्या १७ जागा लढवणार असून, शिवसेना जिल्हा परिषदच्या ६ व पंचायत समितीच्या १७ जागा लढवेल. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात भाजप जिल्हा परिषदच्या ४ व पंचायत समितीच्या १७ जागा, तर शिवसेना जिल्हा परिषदच्या ११ व पंचायत समितीच्या १५ जागा लढवणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजप जिल्हा परिषदच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागा, तर शिवसेना जिल्हा परिषदच्या २ व पंचायत समितीच्या ५ जागा लढवणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
महायुतीला शंभर टक्के यश - नारायण राणे
या निवडणुकीत महायुतीला शंभर टक्के यश मिळेल, असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. महानगरपालिका निवडणुकांप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही महाराष्ट्रात महायुतीचाच विजय होईल आणि त्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर राहील, असा दावाही त्यांनी केला. जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडेल. विरोधकांकडे लढण्याइतकी ताकद उरलेली नाही, त्यामुळे महायुतीला मोठे यश मिळेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून, सर्व जागांवर सक्षम व ताकदवान उमेदवार देण्याचा निर्धार महायुतीने केला असल्याचे त्यांनी सांगितले.