सिंधुदुर्गनगरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'महायुती' न होता 'मैत्रीपूर्ण लढत' होईल, असा स्पष्ट निर्णय झाल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी येथे दिली. महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी याच विचाराने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जिल्हा दौऱ्यावर आलेले पालकमंत्री राणे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली.
महायुती न करण्यामागचे कारण स्पष्ट करताना राणे म्हणाले की, आम्ही महायुती करून बंडखोरीला कशासाठी मदत करायची..? महायुती झाल्यास महाविकास आघाडीतील घटक पक्षांना आयते उमेदवार मिळतील, तेव्हा प्रत्येक घटक पक्षाने स्वबळावर लढून आपली ताकद दाखवावी, अशी भूमिका राणे यांनी मांडली.
महाविकास आघाडीला आव्हान देताना नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केला की, कणकवली नगरपंचायतीसाठी किंवा जिल्हा परिषदेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाकडे उमेदवार आहेत का? त्यांच्याकडे उमेदवार नसल्याने ते महायुतीच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत, असेही राणे म्हणाले.
आमच्याकडे लढण्यासाठी ५० सक्षम आणि तयार उमेदवार आहेत, असे सांगत राणे यांनी भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. ज्यांना कोणाला ताकद दाखवण्याची इच्छा असेल, त्यांनी रिंगणामध्ये ती स्पष्टपणे दाखवावी, असे थेट आव्हानही राणे यांनी विरोधकांना दिले.
प्रत्येक तालुक्यातील नेते व कार्यकर्ते आपापल्या कामाला लागले असून, यावेळी महायुती न होता मैत्रीपूर्ण लढत होणार हे निश्चित झाले आहे, असे राणे यांनी नमूद केले. राजकीय कुरघोडी आणि भांडणांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा जनतेचा विकास करणे हेच आमचे प्रमुख ध्येय असेल, असे राणे म्हणाले.
नीती आयोगाची 'टीम' येणार..!
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रशासकीय कामांसाठी उपयोग करणारा सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.
या महत्त्वपूर्ण 'एआय मॉडेल'चा सखोल अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाची एक उच्चस्तरीय टीम येत्या ३० व ३१ ऑक्टोबर असे दोन दिवस जिल्ह्याला भेट देणार आहे. जिल्हा विकासासाठी 'एआय' तंत्रज्ञानाचा कसा यशस्वीपणे उपयोग केला आहे, याचे निरीक्षण आणि विश्लेषण ही टीम करणार आहे, असे नितेश राणे म्हणाले.