सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा X
महाराष्ट्र

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळात आखाड्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली.

Swapnil S

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळात आखाड्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली. याशिवाय छोट्या संस्थानसाठी प्रति संस्थान १५ लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकाची भरणा प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याचे तसेच आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले. पुढील वर्षी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सिंहस्थ कुंभमेळा आढावा घेतला.

कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या साधू, महंत आणि भाविक यांची सेवा करीत त्यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य- दिव्य आयोजन करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिह राजे भोसले उपस्थित होते. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सादरीकरण केले. बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी साधू महंतांनी दिलेल्या सूचना स्वागतार्ह असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, साधू, महंतांनी जे चांगले काम होत आहे, त्याचे कौतुक केले आहे तसेच जे काम अधिक गतीने व परिणामकारक व्हायला पाहिजे, त्यासाठी सूचना केल्या आहेत. साधू महंतांच्या बैठकीतील चर्चेने कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी निश्चितच मदत होणार आहे. कुंभमेळ्याच्या व्यवस्थेसाठी बृहद नियोजन करण्यात आले आहे.

पुढील कुंभमेळ्यासाठीही नियोजन

पुढील वर्षी होत असलेल्या कुंभमेळ्याचे नियोजन आणि तयारी ही केवळ याच कुंभमेळ्यासाठी नसून ती पुढील १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी असणार आहे. पुढील काळात व्यवस्थेला या कुंभमेळ्यासाठी उभारलेल्या कामातूनच पुढील व्यवस्था उभाराव्या लागतील, अशा पद्धतीने काम करण्यात येत आहे. कुंभमेळा निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात स्थायी स्वरूपात विकासकामे होतील, याचाच प्राधान्याने विचार होत आहे. कुंभमेळा हा भविष्यातही विस्तारणारा असल्याने त्या पद्धतीने व्यवस्थांची उभारणी करण्यात येत आहे, असे फडणवीस म्हणाले.

प्रत्येकासाठी आरोग्य व्यवस्था

त्र्यंबकेश्वर देशामध्ये अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. गोदावरी नदी उगमाच्या पवित्र सानिध्यामध्ये हा कुंभमेळा होत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात कॉरिडॉरचे निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा होईल तसेच नाशिक येथील कुंड, रामकाल पथ, मंदिर, गुफा यांचाही जीर्णोध्दार करण्यात येत आहे. संपूर्ण नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात अध्यात्म पूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कुंभमेळा निमित्ताने आरोग्य व्यवस्थेचाही बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक साधू, महंत आणि भाविकांना आरोग्य विषयक कुठलीही अडचण होणार नाही याची परिपूर्ण दक्षता घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर दर्शन पथ प्रकल्प

  • एकूण खर्च ६६५ कोटी रुपये

  • अखंड दर्शनासाठी एकेरी मार्ग प्रणाली

    टप्पे : पहिला टप्पा २७५ कोटी; दुसरा टप्पा ३९० कोटी

  • ९ हजार भाविकांची क्षमता असलेले 'शिव दर्शन संकुल', वातानुकूलित हॉल आणि एलईडी स्क्रीनची सुविधा

  • ५ मिनिटांत आपत्कालीन निर्गमन क्षमता आणि एआय-आधारित गर्दी व्यवस्थापन

  • काळ्या पाषाणातील पारंपारिक मराठा शैलीतील बांधकाम

  • शहरातील वाहतूक कोंडीत ८० टक्के घट आणि स्थानिक विक्रेत्यांचे पुनर्वसन

भाडेकरुने घरमालकाची शांतता भंग करणे हा ‘उपद्रव’; HC चे महत्त्वपूर्ण निरीक्षण, पुण्याच्या बुधवार पेठेत लॉज चालवणाऱ्याला दणका

मुलाच्या आयुष्यात आई-वडील दोघेही महत्त्वाचे; उच्च न्यायालयाचा निर्वाळा; याचिकाकर्त्या महिलेला झटका

सोन्या-चांदीवरील आयात शुल्क दुप्पट; रुपया सावरण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नीट पेपरफुटीः पुण्यातून महिलेसह पाच ताब्यात; कोचिंग क्लासेस, डॉक्टर्स यांचाही सहभाग?

आता ‘वर्षा’वरही CCTV यंत्रणा; राज्यातील पहिलेच शासकीय निवासस्थान