मुंबई : अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या राज्याच्या ‘एमएच-सीईटी’ परीक्षेबाबतच्या सर्व तक्रारींची सर्वंकष चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. ‘जर यात कोणतीही अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल,’ असे मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.
राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सामायिक प्रवेश परीक्षेशी (सीईटी) संबंधित विविध समस्या मांडल्या होत्या.
या सर्व तक्रारींवर गुन्हा दाखल करून सह-पोलीस आयुक्तांमार्फत त्यांची चौकशी करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच, कथित डेटा लीकप्रकरणी त्यांनी फॉरेन्सिक ऑडिटचे आदेशही दिले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने आधीच घेतला आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, एमपीएससी परीक्षांच्या संदर्भात गठित केलेल्या समितीच्या अध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. सध्या कोणतीही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आणि भविष्यातील कोणताही निर्णय विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल, असे आश्वासन दिले.