महाराष्ट्र

नियतीच्या मनात मृत्यूच होता! एका अपघातात वाचले, पण दुसऱ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू; बीड जिल्हा हादरला

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात सोमवारी रात्री एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली. एका अपघातातून वाचलेल्या सहा तरुणांचा काही क्षणांतच दुसऱ्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला

नेहा जाधव - तांबे

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात सोमवारी रात्री एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली. एका अपघातातून वाचलेल्या सहा तरुणांचा काही क्षणांतच दुसऱ्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराईजवळील गढी पुलावर रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सहा जण एकाच एसयूव्ही कारमधून प्रवास करत होते. रस्ता मोकळा असल्याने कार भरधाव वेगाने जात होती. गढी पुलावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला धडकली. अपघातात वाहनातील सर्वजण किरकोळ जखमी झाले आणि ते गाडीतून खाली उतरले. यानंतर त्यांनी कारला डिव्हायडरवरून बाजूला काढण्याचा प्रयत्न सुरू केला.

मात्र, नियतीच्या मनात मृत्यूच होता. दुर्दैव असे की याच दरम्यान एक भरधाव ट्रक वेगात आला आणि त्याने या सहा तरुणांना चिरडले. ट्रकचा वेग इतका प्रचंड होता की सर्व जण दूरवर फेकले गेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातात बाळू अतकरे, भागवत परळकर, सचिन नन्नवरे, मनोज कारंडे, कृष्णा जाधव, दीपक सुरैया या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण बीड जिल्ह्यातील गेवराई शहराचे रहिवासी होते.

या घटनेनंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. ट्रक जप्त करण्यात आला असून चालक फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कनवट यांनी सांगितले की, “हा अपघात अत्यंत दुःखद आहे. ट्रक चालकाच्या ओळखीचा व त्याच्या स्थीतीचा शोध घेण्यात येत आहे. घटनेचा सखोल तपास सुरू आहे.”

स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील रस्ते सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रशासनाकडे तक्रार केली असून, या भागात आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

१० महिन्यांचा संसार, नवऱ्याचे अनैतिक संबंध, शेवटी टोकाचं पाऊल; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

चोरीच्या संशयावरून १४ वर्षाच्या मुलासोबत राक्षसी कृत्य; लोखंडी बैलगाडीला बांधलं, खालून आग लावली, धुळ्यातील संतापजनक घटना

शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी दिलासा देणार; शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन; एसटी बस रद्द झाल्यास मिळणार तत्काळ मदत

ठाण्यातील मतदार यादीत घोळ; साडेचार लाख मतदार वाढले कसे? - मनसेचा आरोप; निवडणूक अधिकारी लग्नात व्यस्त

आज होणाऱ्या TET परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजारांहून अधिक नोंदणी; गैरप्रकार रोखण्यासाठी CCTV सह Ai तंत्रज्ञानाचा वापर